कराड जनता बँकेच्या ठेविदारांना मिळणार ३२९ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:40 AM2021-04-24T04:40:47+5:302021-04-24T04:40:47+5:30
कराड : कराड जनता सहकारी बँकेच्या पाच लाखांच्या आतील ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठेव ...
कराड : कराड जनता सहकारी बँकेच्या पाच लाखांच्या आतील ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठेव हमी पत विमा कॉर्पोरेशनच्या वतीने ३९ हजार ३२ ठेवीदारांना सुमारे ३२९ कोटी ७६ लाख ९३ हजार ३१७ रुपयांची रक्कम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या खात्यावर ऑनलाइन दिली जाणार आहे. याबाबतची माहिती बँकेचे अवसायक मनोहर माळी यांनी दिली. यामुळे ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे.
येथील कराड जनता बँक अवसायनात काढण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक आणि सहकार खात्याने डिसेंबर २०२० मध्ये घेतला होता. त्यानंतर अवसायक म्हणून उपनिबंधक मनोहर माळी यांची नियुक्ती करण्यात आली होती. रिझर्व्ह बँकेने या बँकेचा परवाना रद्द करताना पाच लाखांच्या आतील ठेवीदारांना त्यांची रक्कम परत देणार असल्याची ग्वाही दिली होती.
अवसायक मनोहर माळी यांनी केलेल्या प्रयत्नामुळे ठेव हमी पत विमा कॉर्पोरेशनने अखेर २२ एप्रिल रोजी यास मंजुरी दिली आहे. ३९ हजार ३२ ठेवीदारांना सुमारे ३२९ कोटी ७६ लाख ९३ हजार ३१७ रुपयांची रक्कम कराड जनता बँकेच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.
मनोहर माळी म्हणाले की, बँकेच्या ४० हजार ४१५ ठेवीदारांनी केवायसी जमा केली होती. यातील ३९ हजार ३२ ठेवीदारांच्या केवायसी मंजूर झाल्या आहेत . त्यामुळे पात्र ठेवीदारांना ३२९ कोटी ७६ लाख ९३ हजार ३१७ रुपयांची रक्कम मंजूर झाली असून, ती कराड जनता बँकेच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.