साताऱ्यासह कऱ्हाड, खंडाळ्यात मुसळधार पाऊस; नागरिकांची उडाली तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 12:07 PM2022-10-12T12:07:52+5:302022-10-12T12:08:12+5:30

शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

Karad, Khandala, Satara in heavy rain, An atmosphere of anxiety among farmers | साताऱ्यासह कऱ्हाड, खंडाळ्यात मुसळधार पाऊस; नागरिकांची उडाली तारांबळ

साताऱ्यासह कऱ्हाड, खंडाळ्यात मुसळधार पाऊस; नागरिकांची उडाली तारांबळ

Next

सातारा : साताऱ्यासह खंडाळा परिसरात मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे नागरिकांची चांगलीच पळापळ झाली. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे वातावरणात गरमी जाणवत होती. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास पाऊस झाल्यामुळे वातावरणात बदल होऊन गारवा निर्माण झाला.

सातारा परिसरात परतीचा पाऊस कमी पडतो. तर माण, खटाव,फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पडत असतो. मात्र यंदा साताऱ्यातही परतीचा पाऊस पडत आहे. साताऱ्यात मंगळवारी सकाळपासून ढग जमा झाले होते. यामुळे यवतेश्वर घाट ढगात झाकून गेला होता. त्यातच दुपारी साडेतीनच्या सुमारास अंधारून आले. त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे नागरिकांची मात्र चांगलीच पळापळ झाली. खंडाळा परिसरातही चांगला पाऊस झाला. यामुळे पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात मात्र संथगतीने वाहतूक सुरू होती.

कऱ्हाडला जोरदार पावसाने झोडपले

कऱ्हाड शहरासह परिसराला जोरदार पावसाने झोडपून काढले. तासभर पडलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. शाहू चौकासह भेदा चौक मार्गावर पाणी साचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. तसेच किरकोळ विक्रेत्यांचे साहित्य भिजून नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.

शेतकऱ्यांनी भांगलणीसह इतर मशागतीची कामे हाती घेतली होती. शेतीच्या कामात शेतकरी व्यस्त होते. सोयाबीन तसेच भुईमुगाची काढणीही जवळ आली आहे. त्यातच मंगळवारी रात्री जोरदार पावसाने झोडपून काढले. रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला पाऊस उशिरापर्यंत सुरूच होता.

जोरदार पावसामुळे शहरातील शाहू चौक ते जुन्या कोयना पुलाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. तसेच भेदा चौक ते पंचायत समिती मार्गावरही पाणी साचल्यामुळे चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागली. शहरातील इतर सखल भागांतील रस्त्यावरही पाणी साचले होते.  किरकोळ विक्रेत्यांचे साहित्य भिजून नुकसान झाले.

Web Title: Karad, Khandala, Satara in heavy rain, An atmosphere of anxiety among farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.