थकबाकीदारांची नावे झळकणार फलकावर!, कऱ्हाड पालिकेचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 05:54 PM2022-01-11T17:54:16+5:302022-01-11T17:54:48+5:30
कऱ्हाड : शासकीय कार्यालयांसह शहरातील करवसुलीवर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील थकबाकीदारांची नावे फलकावर लिहून ते फलक सार्वजनिक ...
कऱ्हाड : शासकीय कार्यालयांसह शहरातील करवसुलीवर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील थकबाकीदारांची नावे फलकावर लिहून ते फलक सार्वजनिक ठिकाणी लावले जाणार आहेत. शासकीय करवसुलीचीही पालिकेने स्वतंत्र व्यवस्था केली आहे.
कऱ्हाड पालिकेने आतापर्यंत पाच कोटींची वसुली केली आहे. अद्यापही १४ कोटींची थकबाकी वसूल होणे बाकी आहे. त्यात शासकीय कार्यालयांची सव्वा कोटीच्या आसपास वसुली बाकी आहे. त्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. शहराचे चार वेगवेगळे भाग करून पाच पथकांकडे वसुलीची जबाबदारी दिली आहे.
शहरातील प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक, पंचायत समिती उपजिल्हा रुग्णालयासह शहरातील तब्बल बाराहून अधिक विविध शासकीय कार्यालयांकडे पाच वर्षांपासून पालिकेची तब्बल सव्वा कोटी कराची थकबाकी आहे. त्यासोबत शहरातील नागरिकांकडूनही पाणीपट्टी व घरपट्टीची थकबाकी शिल्लक आहे. पालिकेला कोरोनामुळे कोणतेही उत्पन्नाची स्रोत नसल्याने पालिकेने करवसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी पाणी व घरपट्टीच्या वसुलीसाठी मोठे निर्णय मुख्याधिकारी रमाकांत डाके घेत आहेत.
शहरातील मोठ्या थकबाकीदारांची नावे फलकावर लिहून ते फ्लेक्स सार्वजनिक ठिकाणी लावले जाणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी डाके यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी पालिकेचा संकलित कर भरून सहकार्य करण्याचे आवाहन डाके यांनी केले आहे. शहराचे चार वेगवेगळे भाग करून तेथील नागरिकांच्या थकीत कराच्या वसुलीसाठी स्वतंत्र पथके नेमली आहेत. शासकीय थकबाकीही कोटीत आहे. या वसुलीचे आव्हान आहे.