कराड पाटण शिक्षक सोसायटीच्या सभेत 'ऑडिट' ऐरणीवर

By प्रमोद सुकरे | Published: July 31, 2024 03:38 PM2024-07-31T15:38:12+5:302024-07-31T15:39:09+5:30

प्रमोद सुकरे कराड : संपूर्ण सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या, जिल्हात अनेक शाखेच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या कराड पाटण शिक्षण सोसायटीच्या ...

Karad Patan Education Society Annual General Meeting on Audit topic | कराड पाटण शिक्षक सोसायटीच्या सभेत 'ऑडिट' ऐरणीवर

कराड पाटण शिक्षक सोसायटीच्या सभेत 'ऑडिट' ऐरणीवर

प्रमोद सुकरे

कराड : संपूर्ण सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या, जिल्हात अनेक शाखेच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या कराड पाटण शिक्षण सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 'ऑडिट' विषय ऐरणीवर आला. जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याच्या विषयावरून त्याचे अगोदर शासकीय स्ट्रक्चरल आँडिट करून घ्या. खाजगी ऑडिट सोयीने करून मिळतात. अशी टिका विरोधकांनी केली. सत्ताधारी विरोधकांच्यात जुंपल्यावर तुमच्या पाठीमागच्या कारभाराचे 'ऑडिट' सगळ्यांसमोर मांडू का? असा इशारा मिळाल्यावर 'समझदार को इशारा काफी होता है' याची प्रचिती आली.विरोधक नरमल्याचे चित्र पहायला मिळाले. आता जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्यात याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत.

कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीची ७३वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी वैशाली पवार होत्या. तर संचालक मंडळासह सभासदांची मोठी उपस्थिती होती. विषय पत्रिकेवर कराड येथील संस्थेची जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधणे व तळमावले येथील शाखेसाठी जागा खरेदी करणे हे दोन महत्त्वाचे विषय होते. त्यामुळे शिक्षक वर्तुळात याची गत आठवड्याभरापासूनच चांगली चर्चा रंगली होती.

रविवारी सकाळी११ वाजता सभा होणार होती. मात्र पावसामुळे सुरुवातीला उपस्थिती कमी होती. परिणामी सभा अर्धा तास पुढे ढकलण्यात आली. या दरम्यान सभासदांची संख्या वाढल्याने सभा सुरू करण्यात आली. विषय पत्रिकेवरील सुरुवातीचे विषय एका पाठोपाठ एक मंजूर करण्यात आले. आणि सभेची गाडी दोन संभाव्य वादग्रस्त विषयावर येऊन ठेपली. सत्ताधारी विरोवक एकमेकांसमोर उभे राहून बोलू लागले.त्यामुळे चर्चा नेहमीप्रमाणे मुद्द्यावरुन गुद्दयावर येणार का ? असा प्रश्न अनेकांना पडला. पण सत्ताधाऱ्यांनी मत्सुद्दीपणे सभा हाताळल्याने विरोधकांना मर्यादा आल्या.

अध्यक्षा वैशाली पवार, उपाध्यक्ष  दत्ता जाधव ,संचालक दिनेश थोरात, शशिकांत तोडकर , भारत देवकांत ,अंकुश नांगरे,नीलम नायकवडी आदींनी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देत सर्वांना विश्वासात घेऊनच आम्ही निर्णय घेणार आहोत अशी भूमिका मांडली. पण विरोधक संस्थेचे माजी अध्यक्ष विकास देशमुख, बाजीराव शेटे यांनी अगोदर शासकीय पद्धतीने स्ट्रक्चर ऑर्डर करून घ्या. मगच पुढील निर्णय घ्या अशी मागणी लावून धरली. मग सत्ताधाऱ्यांनी आवाजी मतांनी हा विषय मंजूर करून घेतला.

दरम्यान विरोधकांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नावर तुम्ही कसा कारभार केलाय त्याचे 'ऑडिट' करूया का ? असा सवाल दिनेश थोरात यांनी करत आपल्या हातातील लाल फाईल दाखवली. यात तुमचा कारभार आहे. त्याचा ट्रेलर दाखवू का? असा इशारा दिला खरा पण झाकली मूठ सव्वा लाखाची याचीच प्रचिती येथे आली.

कोणते 'ऑडिट' खरे धरायचे?

कराड येथील संस्थेची जुनी इमारत पाडून तेथे नवीन इमारत बांधण्याबाबत सभेमध्ये चर्चा झाली. यावेळी सदरची इमारत जीर्ण झाली आहे. पालिकेने याबाबत नोटीस बजावल्या असून संचालक मंडळांनी करून घेतलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही इमारत धोकादायक असून ती वापरास अयोग्य असल्याचे नमूद करण्यात आल्याचे संचालकांनी सांगितले.तर याच इमारतीचे एका खाजगी इंजिनियर कडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले असून त्यात संपूर्ण इमारत धोकादायक नसून नंतर वाढवलेल्या गॅलरी धोकादाय असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे असे माजी अध्यक्ष विकास देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे नक्की ऑडिट रिपोर्ट कोणता खरा? असा प्रश्न समोर येतो.

या ही सभेत 'खोक्याची भाषा'

विरोधकांनी करुन आणलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट बाबत बोलताना तुम्ही चिरीमिरी की खोकी देऊन हा आँडिट रिपोर्ट करून आणला आहे माहित नाही पण संचालक मंडळाने नगरपालिकेच्या सूचनेनुसार तज्ञ इंजिनिअर कडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले आहे अशी खोचक टिप्पणी काहींनी विरोधकांना उद्देशून केली. त्यावर विकास देशमुख यांनी शासकीय स्ट्रक्चर करून घ्या असा जोर लावला. पण सभेतील 'खोक्याची भाषा' चर्चेची ठरली.

सासुरवाडीची भांडी अजूनही शिल्लक!

संस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षी सभासदांना काहीतरी भेट वस्तू दिली जाते. त्यामध्ये प्रामुख्याने छोटी मोठी भांडी दिली जातात. पण आमच्याकडे सासुरवाडीने दिलेली भांडी अजूनही शिल्लक आहेत अशी टिप्पणी एका शिक्षकांने केली. त्या ऐवजी आमचे व्याजदर कमी करा किंवा अन्य उपाययोजना करा अशी टिप्पणी करताच उपस्थितांच्यात खसखस पिकली.

Web Title: Karad Patan Education Society Annual General Meeting on Audit topic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.