Satara: बनावट सोन्याचे बिस्किट देत लूटमार; कऱ्हाडात बिहारी टोळीचा पर्दाफाश, एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:05 IST2025-01-04T12:05:08+5:302025-01-04T12:05:29+5:30

पाच जण पसार 

Karad police arrested one of Bihar gang who robbed genuine jewelery by giving fake gold biscuits | Satara: बनावट सोन्याचे बिस्किट देत लूटमार; कऱ्हाडात बिहारी टोळीचा पर्दाफाश, एकास अटक

Satara: बनावट सोन्याचे बिस्किट देत लूटमार; कऱ्हाडात बिहारी टोळीचा पर्दाफाश, एकास अटक

कऱ्हाड : सोन्याची बनावट बिस्किटे देऊन वृद्ध महिलांकडील सोन्याचे खरे दागिने लुटणाऱ्या बिहारच्या टोळीचा कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या टोळीतील एकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले. तर, पाच जण पसार झाले आहेत. त्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. अटक केलेल्या चोरट्याकडून पोलिसांनी दीड तोळ्याची सोन्याची साखळी हस्तगत करण्यात आली आहे.

विरेंद्र साहू (वय ३२, मूळ रा. बिहार, सध्या रा. कऱ्हाड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटण तालुक्यातील बेलवडे येथील अनिता अशोक तर्टे यांना दोन दिवसांपूर्वी कऱ्हाडच्या बस स्थानक परिसरात भामट्यांनी बनावट सोन्याचे बिस्किट देऊन त्यांची दीड तोळ्याची सोन्याची चेन लुटली होती. याबाबत अनिता तर्टे यांनी कऱ्हाड शहर पोलिसात फिर्याद दिली.

गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक भापकर यांच्यासह उपनिरीक्षक आंदलकर, धीरज कोरडे, मोहसीन मोमीन, अनिल स्वामी, दिग्विजय सांडगे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ, अमोल देशमुख हे या गुन्ह्याचा तपास करीत असताना, शिराळा व पलूसमध्येही अशाच चोऱ्या झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी सापळा रचला असता, या गुन्ह्यांमध्ये सहा जणांची टोळी असल्याचे समोर आले.

या टोळीच्या कऱ्हाडातील राहत्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी विरेंद्र साहू पोलिसांच्या हाती लागला, तर अन्य पाच जण पसार झाले. पळून गेलेल्या पाच जणांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या टोळीने साताऱ्यासह सांगली जिल्ह्यातही गुन्हे केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तसेच, अन्यही काही जिल्ह्यांत गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास केला जात आहे. सहायक पोलिस निरीक्षक अशोक भापकर तपास करीत आहेत.

घरातून पॉलिश पावडर हस्तगत

पोलिसांनी छापा टाकण्यापूर्वी सुमारे अर्धा तास आधी टोळीतील पाचजण घरातून बाहेर गेले होते. अर्ध्या तासापूर्वी पोलिसांनी छापा टाकला असता, तर संपूर्ण टोळीच पोलिसांच्या हाती लागली असती. पोलिसांच्या हाती लागलेल्या विरेंद्र साहू यानेही पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला पाठलाग करून पकडण्यात आले. त्याच्याकडून गोल्ड पॉलिश, चांदी पॉलिश पावडर आणि सोन्यासारखे दिसणारे बिस्किट हस्तगत करण्यात आले आहे.

Web Title: Karad police arrested one of Bihar gang who robbed genuine jewelery by giving fake gold biscuits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.