करंजोशीतील तरुणाचा छेडछाडीच्या कारणातून खून; नऊ जणांना अटक
By दत्ता यादव | Published: June 18, 2024 08:45 PM2024-06-18T20:45:13+5:302024-06-18T20:45:29+5:30
अवघ्या चार तासांत गुन्हा उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : करंजोशी, ता. कऱ्हाड येथील रोहिदास मारुती पन्हाळकर (वय २१) या तरुणाच्या खुनाचा अवघ्या चार तासांत छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलिसांना यश आले. हा खून मुलीची छेड काढल्याच्या कारणातून झाला असल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी नऊ जणांना पोलिसांनी अटक केली असून, यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
ओंकार हणमंत पन्हाळकर (२०), निखिल रमेश पन्हाळकर (२२), रोहित मारुती पवार (२१, सर्व रा. करंजोशी, ता. कऱ्हाड), आदित्य नामदेव पवार (१८, रा. गडकर आळी, सातारा), साहिल जयसिंग पिंपळे (१९, रा. मालोशी, ता. पाटण), तेजस सचिन पन्हाळकर (२१, रा. करंजोशी, ता. कऱ्हाड), कुमार एकनाथ पन्हाळकर (२२, रा. करंजोशी), देवेंद्र बनाजी घाडगे (२८, रा. करंजोशी, ता. कऱ्हाड), एक विधी संघर्षग्रस्त बालक, अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
नागठाणे, ता. सातारा येथे दि. १६रोजी रात्री आठ वाजता रोहिदास पन्हाळकर याला काही युवकांनी मारहाण केली होती. त्यानंतर दोन तरुणांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलिसांनी संयुक्तरीत्या या प्रकरणाचा तपास सुरू केला. रोहित पवार, ओंकार पन्हाळकर या दोघांनी रोहिदास याला जखमी अवस्थेत सिव्हिलमध्ये दाखल केले होते. या दोघांकडे पोलिसांनी चाैकशी सुरू केल्यानंतर त्यांनी सांगितलेली हकीकत आणि गुन्हा घडलेल्या परिस्थितीमध्ये तफावत आढळून आली. यामुळे पोलिसांचा या दोघांवर संशय बळावला. पोलिसी खाक्या दाखविताच या दोघांनी इतर तरुणांना सोबत घेऊन खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी सातजणांना अवघ्या चार तासांत विविध ठिकाणांतून अटक केली. मुलीच्या छेडछाडीतून रोहिदास याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. न्यायालयाने आरोपींना सात दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे, सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सुधीर पाटील, पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, तानाजी माने, अंमलदार सुधीर बनकर, विजय कांबळे, संजय शिर्के, आतिश घाडगे, नीलेश फडतरे, सचिन साळुंखे, मंगेश महाडिक, लक्ष्मण जगधने, मनोज जाधव, अमित माने, अरुण पाटील, सनी आवटे, अमित झेंडे, राजू कांबळे, अजय जाधव यांनी कारवाईत भाग घेतला.