खेडला तिरंगी लढतीचे संकेत
By admin | Published: July 12, 2015 09:55 PM2015-07-12T21:55:04+5:302015-07-12T21:55:04+5:30
सत्तासंघर्ष : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची ग्रामपंचायत
सातारा : लोकसंख्येच्या दृष्टिने महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाची ग्रामपंचायत अशी ख्याती मिळविलेल्या सातारा तालुक्यातील खेड ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे रण तापू लागले आहे.
या निवडणुकीसाठी तीन पॅनेल पडण्याची चिन्हे आहेत. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील निवासस्थानी जाऊन एका गटाने खासदार उदयनराजे भोसले यांना नेतृत्वासाठी साकडे घातल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
सातारा शहरासह शेजारच्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मनोमिलनाची सत्ता आहे. हे दोन राजे ज्या बाजूने त्याच गटाची सत्ता संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असते. ग्रामपंचायतीच्या सत्ताकारणावरच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य अवलंबून असल्याने विविध गटांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या राजकारणात विशेष लक्ष घातले आहे.
दरम्यान, मूळच्या सातारा तालुक्यात पण कोरेगाव मतदारसंघात येणाऱ्या ग्रामपंचायतींवर आमदार शशिकांत शिंदे व माजी खासदार लक्ष्मणराव पाटील या दोन गटांची सत्ता आहे.
मतदारसंघ पुनर्रचनेत खेड ग्रामपंचायत कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत गेली आहे.
या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीअंतर्गत तीन गट आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांना मानणारा एक, आमदार शशिकांत शिंदेंना मानणारा व तिसरा माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे नेतृत्व मानणारा असे तीन गट येथे कार्यरत आहेत. सध्या आमदार शशिकांत शिंदे यांचे नेतृत्व मानणाऱ्या अनिल पवार यांच्या गटाची खेड ग्रामपंचायतीवर सत्ता आहे. या सत्तेविरोधात उर्वरित दोन गटांनी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.
खासदार उदयनराजे भोसले यांना एका गटाने साकडे घातले आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष रवी साळुंखे, हरिश्चंद्र लोखंडे, चंद्रकांत लोखंडे यांच्या गटाने नुकतीच पुणे येथे जाऊन पॅनेलचे नेतृत्व करण्याची विनंती उदयनराजेंकडे केली.
या गटाला उदयनराजेंनी पूर्ण ताकद देण्याची तयारी दर्शविल्याची जोरदार चर्चा आहे. अनिल पवार यांच्या गटानेदेखील सत्ता अबाधित राखण्यासाठी अडाखे आखले आहेत. सुशील मोझर यांच्या गटानेही चाचपणी सुरु केली असून माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव मिलींद पाटील व दत्तानाना उत्तेकर यांच्या गटानेही ग्रामपंचायतीत शिरकाव करण्याची तयारी केली आहे.
निवडणुकीसाठी विविध गट तयारीला लागले असून गुप्त बैठका, चर्चांना ऊत आलेला आहे. कोण कुणाशी हातमिळमिळवणी करणार?, हे काही दिवसांतच समोर येईल. गावात मात्र कोण कुणाच्या गटात असणार याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. निवडून येण्याची क्षमता व वॉर्डात असणारा प्रभाव याच्या आधारावर उमेदवार शोधण्याची मोहीम विविध गटांनी हाती घेतली आहे. यातून उमेदवारांची ओढा-ओढ होण्याची चिन्हे आता स्पष्ट होऊ लागली आहेत. प्रशासनाच्या दृष्टीनेही ही निवडणूक संवेदनशील म्हणून ओळखली जाते. त्यामुळे आत्तापासूनच प्रशासनाच्या वतीने या ग्रामपंचायतीकडे विशेष लक्ष ठेवले आहे. राजकारणात नव्यानेस सक्रिय झालेल्या युवकांवर प्रशासनाची विशेष नजर आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांच्या बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
एका गटाकडून उदयनराजेंना साकडे !
सातारा तालुक्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सत्ता आहे. हे दोन राजे ज्या बाजूने त्याच गटाची सत्ता संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असते. सध्या खेड ग्रामपंचायत निवडणुकीबाबत काहीच ठोस अंदाज लागत नाही. मात्र एका गटाने उदयनराजेंना साकडे घातले आहे.3
८ आॅगस्टला मतदान
खेड गावची लोकसंख्या १९ हजारांच्या आसपास आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर ग्रामपंचायतीनंतर खेड ग्रामपंचायतीचा क्रमांक लागतो. येत्या ८ आॅगस्ट रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान होणार आहे. त्यामुळे आत्तापासून खेडमधील रणांगण तापले आहे. नागरिकांच्या भेटी गाठी सुरू झाल्या आहेत. कोण कुठल्या गटाचे आहे, याची चाचपणी सुरू झाली आहे.