कऱ्हाड-चिपळूण रेल्वे कागदात अडकली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:48 AM2021-07-07T04:48:45+5:302021-07-07T04:48:45+5:30

कऱ्हाड : कऱ्हाड-चिपळूण रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर कोकण रेल्वे उर्वरित महाराष्ट्राशी जोडली जाण्याच्या आशा बळावल्या होत्या. २०१९ सालच्या अर्थसंकल्पातही या ...

Karhad-Chiplun train stuck in paper! | कऱ्हाड-चिपळूण रेल्वे कागदात अडकली!

कऱ्हाड-चिपळूण रेल्वे कागदात अडकली!

googlenewsNext

कऱ्हाड : कऱ्हाड-चिपळूण रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर कोकण रेल्वे उर्वरित महाराष्ट्राशी जोडली जाण्याच्या आशा बळावल्या होत्या. २०१९ सालच्या अर्थसंकल्पातही या मार्गासाठी निधीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अद्यापही या मार्गाचे काम सुरू झालेले नाही. कऱ्हाड ते चिपळूण रेल्वे केवळ कागदावरच असल्याचे दिसून येते.

कोकण रेल्वे कऱ्हाडमार्गे उर्वरित महाराष्ट्राला जोडण्यासाठी गत अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदी असताना त्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. कऱ्हाडला रेल्वेचे जंक्शन करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता. मात्र, दरवर्षीच्या केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्गाबाबत निराशा होत होती. मागणी करूनही या मार्गाला मंजुरी मिळत नव्हती. सुमारे पाच वर्षांपूर्वी या मार्गासाठीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, पुढे कोणतीच कार्यवाही झाली नाही. प्रक्रिया धिम्यागतीने सुरू असताना कोणताच ठोस निर्णय होत नव्हता.

अखेर २०१९ सालच्या अर्थसंकल्पात कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्गाला हिरवा कंदील मिळाला. सुमारे १०४ किलोमीटरच्या या मार्गासाठी निधीची तरतूदही करण्यात आली. त्यामुळे काही अवधीतच या रेल्वे मार्गासाठी नव्याने सर्वेक्षण होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्याची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र, मंजुरी मिळाल्यानंतर अडीच वर्षाचा कालावधी उलटूनही या मार्गाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्याबाबतच्या कसल्याही हालचाली सध्या दिसून येत नाहीत. त्यामुळे हा प्रस्तावित रेल्वे मार्ग अद्यापही कागदावर असल्याचे दिसून येत आहे.

- चौकट

कऱ्हाडसाठी रेल्वेमार्ग पोषक

कऱ्हाड-चिपळूण लोहमार्गामुळे कोकण भाग उर्वरित महाराष्ट्राशी जोडला जाणार आहे; पण त्याचबरोबर याचा सर्वात जास्त फायदा कऱ्हाडला होणार आहे. या मार्गामुळे कऱ्हाडचे औद्योगिक क्षेत्र झपाट्याने विस्तारण्यास मदत होणार आहे.

- चौकट

९० गावे, १० रेल्वे स्थानके

हा प्रस्तावित रेल्वेमार्ग ९० गावांमधून जाणार असून, रेल्वेमार्गावर १० रेल्वे स्थानके होणार आहेत. कऱ्हाडनंतर साकुर्डी, मल्हारपेठ, नाडे, पाटण, कोयनारोड, मुंढे, खेर्डी, चिपळूण आदी रेल्वे स्थानके होणार आहेत.

- चौकट

सप्टेंबर २०१३ मध्ये पहिल्यांदा सर्वेक्षण

या रेल्वे मार्गामुळे कोल्हापूरसह पुणेही रत्नागिरीच्या जवळ येणार आहे. केंद्रीय रेल्वे बोर्डाने अन्य पर्यायी मार्गापेक्षा चिपळूण-कऱ्हाड हाच रेल्वे मार्ग सोयीचा असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यामुळे सप्टेंबर २०१३ मध्ये चिपळूण येथून या मार्गाच्या सर्वेक्षणाला युद्धपातळीवर सुरुवात झाली होती.

- चौकट

९२८.१० कोटी अपेक्षित खर्च

हा मार्ग सुमारे १०४ किलोमीटर लांबीचा असल्याचे सांगितले जात आहे. तसेच २०१३ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात या मार्गासाठी सुमारे ९२८.१० कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र, अर्थसंकल्पात या मार्गाला मंजुरी देतानाच १२०० कोटींची तरतूद करण्यात आली होती.

- चौकट

सात किलोमीटरचा बोगदा

प्रस्तावित रेल्वे मार्गावर लहान-मोठे एकूण १९ बोगदे असून, यापैकी कुंभार्ली घाटातील बोगदा सात किलोमीटर लांबीचा असणार आहे.

- चौकट

कऱ्हाड आणि चिपळूण जंक्शन

रेल्वेमार्ग प्रत्यक्षात साकार झाल्यानंतर चिपळूणसह कऱ्हाड रेल्वे स्थानकाला जंक्शनचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. हा मार्ग झाल्यास पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक गाडीला येथे हमखास थांबा मिळेल.

- चौकट

कमी खर्च आणि जास्त फायदा

रत्नागिरी-कोल्हापूर, राजापूर-कोल्हापूर, सावंतवाडी-कोल्हापूर या मार्गांचाही विचार झाला होता. मात्र, कमी खर्च आणि जास्त फायदा असल्याने कऱ्हाड-चिपळूण मार्गाला मंजुरी देण्यात आली होती.

फोटो : ०६केआरडी०५

कॅप्शन : प्रतीकात्मक

Web Title: Karhad-Chiplun train stuck in paper!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.