कऱ्हाड शहर होणार ‘वाय फाय’!
By Admin | Published: October 20, 2015 09:31 PM2015-10-20T21:31:14+5:302015-10-20T23:52:02+5:30
सर्व विषय एकमताने मंजूर : ‘सही’वरून सत्ताधारी व विरोधकांत खडाजंगी; पालिका कर्मचाऱ्यांना पंधरा हजारांचा बोनस--कऱ्हाड पालिका विशेष सभा
कऱ्हाड : कऱ्हाड शहरात डिसेंबरअखेर ‘वायफाय’ सुविधा दिली जाणार असून, डिसेंबर २०१५ नंतर पुढे सहा महिने वापरकर्त्यास चोवीस तासांपैकी २० मिनिटे ही सुविधा मोफत दिली जाणार आहे. ही सेवा सुरू करण्याचा ठराव पालिकेच्या विशेष सभेत घेण्यात आला. तसेच दिवाळीसाठी पालिकेतील कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये बोनस देण्याचा ठरावही सर्वानुमते घेण्यात आला.
कऱ्हाड पालिकेची विशेष सभा पालिका सभागृहात मंगळवारी पार पडली. यावेळी सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. नगराध्यक्षा अॅड. विद्याराणी साळुंखे अध्यक्षस्थानी होत्या, तर उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांच्यासह सर्व नगरसेवक, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.कऱ्हाड शहर ‘फोर-जी वाय फाय’ करण्याबाबत आलेल्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या विषयाचे वाचन नगरसेवक मोहसीन आंबेकरी यांनी केले. ‘यावेळी नगरसेवक विनायक पावस्कर यांनी या ठरावाला विरोध करीत आम्हाला सविस्तर माहिती दिली नसल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर केला. ‘शहराच्या फायद्यासाठी मांडण्यात आलेला ‘वाय फाय’चा ठराव वाय फाय नसून ‘काय फाय’ आहे. जोपर्यंत कंपनीकडून प्रकल्पाबाबत पूर्ण माहिती मिळत नाही तोपर्यंत ठरावाला मंजुरी देऊ शकत नाही,’ असे पावसकर म्हणाले. तर ‘वाय फाय’ हा प्रकल्प शहराच्या हितासाठी आहे की कुणा दुसऱ्याच्या हितासाठी आहे, याचा तपास करावा लागणार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. मुख्याधिकाऱ्यांनी खुलासा करण्याची मागणी पावसकरांनी केली. यावर सर्व कागदपत्रांची तपासणी केल्याशिवाय व कंपनीतर्फे देण्यात येणाऱ्या सुविधांच्या कराराबाबत माहिती घेतल्याशिवाय मंजुरी दिली जाणार नाही. तसेच इतरही कंपन्यांकडून वाय फायबाबत प्रस्ताव आल्यास त्याचा विचार केला जाईल, अशी माहिती मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांनी सभागृहास दिली.
यावेळी नगरसेवक विनायक पावसकर यांनी कर्मचाऱ्यांकडून पालिकेतील कोणत्याही प्रकारच्या कामांची सविस्तर माहिती दिली जात नाही. माहिती मागितल्यास टाळाटाळ केली जाते, असे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यावर सत्ताधारी व विरोधकांच्यात खडाजंगी झाली. पालिका फक्त फायद्यासाठी आहे काय, असा सवालही यावेळी विनायक पावसकर यांनी उपस्थित केला. यावर भारतातील ‘वाय फाय’ सुविधा पुरविणारी ‘रिलायन्स इन्फो कंपनी’ ही एकमेव कंपनी असून, या कंपनीमार्फत डिसेंबर २०१५ पासून कऱ्हाड शहरात ‘वाय फाय’ सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रिलायन्स इन्फो कंपनीचे अधिकारी किशोर पाटील यांनी सभागृहास
दिली. यावेळी नगरसेवक प्रमोद कदम यांनी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या दिवाळी बोनसचा विषय सभागृहात मांडला. पालिकेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला दिवाळी बोनस म्हणून पंधरा हजार रुपये देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. (ंप्रतिनिधी).
सभागृहात रंगले खऱ्या-खोट्याचे नाट्य
मंगळवारी पालिकेच्या सभागृहात घेण्यात आलेल्या विशेष सभेदरम्यान खरे-खोटे नाट्य रंगले. पालिकेतील अधिकारी व कर्मचारी कामांबाबत सविस्तर माहिती देत नसल्याचा आरोप पावसकर यांनी सभेत केला. त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला सभेत बोलावून घेतले. पावसकर यांनी मागितलेली माहिती दिली का व त्या माहितीच्या कागदावर पावसकरांनी सही मागितली का, अशी विचारणा त्या कर्मचाऱ्याला करण्यात आली. कर्मचाऱ्याने त्यास होकारार्थी उत्तर दिले.
आम्ही
‘फायदाच’ पाहतोय...
पालिकेच्या विशेष सभेवेळी शहरात ‘वाय फाय’ सेवा सुरू करण्याचा ठराव मंजुरीसाठी सत्ताधारी मंडळींनी मांडला असता मांडण्यात आलेला ठराव नक्की कोणाच्या फायद्यासाठी होणार आहे? गेली चार वर्षे आम्ही पालिकेला झालेला फायदाच पाहतोय, अशी टीका नगरसेवक पावसकर यांनी केली.