कऱ्हाड वाचनालयाची होणार ‘ई लायब्ररी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:46 AM2021-08-18T04:46:09+5:302021-08-18T04:46:09+5:30

कऱ्हाड : वाचन चळवळ जोपासतानाच या चळवळीला बळ देणारे कऱ्हाडचे नगर वाचनालय ‘ई लायब्ररी’ करण्याचे नियोजन असून त्यादृष्टीने प्रयत्न ...

Karhad library to have 'e-library'! | कऱ्हाड वाचनालयाची होणार ‘ई लायब्ररी’!

कऱ्हाड वाचनालयाची होणार ‘ई लायब्ररी’!

Next

कऱ्हाड : वाचन चळवळ जोपासतानाच या चळवळीला बळ देणारे कऱ्हाडचे नगर वाचनालय ‘ई लायब्ररी’ करण्याचे नियोजन असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. अंधांसाठी ‘ऑडिओ लायब्ररी’ सुरू करणाऱ्या या वाचनालयाच्या वाटचालीतील हा महत्त्वाचा टप्पा असणार आहे. सद्य:स्थितीत सुमारे एक लाख ग्रंथांच्या माध्यमातून पाच हजारांवर सभासदांची वाचनाची भूक भागविण्याचे काम या नगर वाचनालयामार्फत होत आहे.

कऱ्हाडच्या नगर वाचनालयाला १६६ वर्षांचा इतिहास आहे. या कित्येक दशकांच्या कालावधीत उत्तरोत्तर वाचनालयाने अनेक प्रगतीचे टप्पे पार केले आहेत. सध्या हे वाचनालय आधुनिकतेच्या मुख्य टप्प्यावर असून मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, गुजराती यासह विविध भाषेतील सुमारे एक लाख ग्रंथ घेऊन ‘ई लायब्ररी’ बनण्याच्या वाटेवर आहे. १८५७ साली या वाचनालयाची स्थापना झाली. शहरातील चावडी चौकात असणाऱ्या एका पडक्या खोलीत त्याकाळी ते चालविले जात होते. १९५२ पर्यंत तेथे केवळ ४३० पुस्तके उपलब्ध होती. मात्र, १०६० च्या दशकानंतर वाचनालयाच्या एकंदर प्रगतीला चालना मिळाली आणि ती आजअखेर कायम आहे.

वाचनसंस्कृती टिकवणे, चळवळीला बळ देणे आणि वाचनाच्या माध्यमातून सुसंस्कारित पिढी घडविण्याच्या कार्यात या वाचनालयाचे मोठे योगदान आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील हजारोजण या वाचनालयाचे सभासद आहेत. दरवर्षी लाखो ग्रंथ या वाचनालयाच्या माध्यमातून वाचले जातात, तसेच प्रशासकीय अधिकारी घडविण्यातही या वाचनालयाचा मोठा वाटा आहे.

- चौकट

... अशी वाढली ग्रंथसंख्या

वर्ष : ग्रंथसंख्या

१९५२ : ४३०

१९७१ : १७६३९

१९८५ : ४५८७५

२००० : ६८१०४

२०२१ : ९६९२७

- चौकट

वाचनालयाचे सभासद

वर्ष : सभासद

१९६२ : १४०

१९७१ : ७४९

१९८५ : ३४८१

१९९९ : ४१४०

२००५ : ४४३०

२०२१ : ४७२५

- चौकट

सभासदांची वर्गवारी

बालविभाग : १२१

अ वर्ग : १८५

ब वर्ग : ४१२०

मासिक : २९९

एकूण : ४७२५

- चौकट

१०८ अधिकारी; ३० जणांची पीएच.डी.

कऱ्हाडच्या नगर वाचनालयातील अभ्यासिकेच्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून १०८ जण अधिकारी बनले आहेत, तसेच १९७१ पर्यंत नऊ, तर २००० सालापर्यंत ३० संशोधकांना ‘पीएच.डी.’ पदवी मिळवून देण्यात वाचनालयाने मोलाचा वाटा उचलला आहे.

- चौकट (फोटो : १७केआरडी०७)

‘ऑडिओ लायब्ररी’चा अंधांना फायदा

अंधांना शिक्षित करणाऱ्या विशेष शाळा आहेत. ब्रेल लिपीच्या माध्यमातून तेथे त्यांना शिक्षणही दिले जाते. मात्र, त्यांना अधिकाधिक ज्ञान अवगत होण्यासाठी ७ मार्च २०२० पासून वाचनालयात ‘ऑडिओ लायब्ररी’ सुरू करण्यात आली आहे. ज्यांना वाचता येत नाही, असे लोक ऑडिओद्वारे विविध पुस्तकांची माहिती येथे घेऊ शकतात.

- चौकट (फोटो : १७केआरडी०६)

... अशी असेल ‘ई लायब्ररी’

१) ग्रंथसंपदेची माहिती ऑनलाईन असणार

२) घरबसल्या पुस्तकांची उपलब्धता पाहता येणार

३) ऑनलाईन पद्धतीने पुस्तक मागणी नोंदविता येणार

४) पुस्तक घेतल्याचा मेसेज मोबाईलवर प्राप्त होणार

५) पुस्तक जमा करण्याच्या तारखेची मेसेजद्वारे सूचना मिळणार

फोटो : १७केआरडी०५

कॅप्शन : प्रतिकात्मक

फोटो : १७केआरडी१०

कॅप्शन : कऱ्हाडातील नगर वाचनालयात मोठ्या प्रमाणावर ग्रंथसंपदा असून हजारो नागरिक या वाचनालयाचे सभासद आहेत.

Web Title: Karhad library to have 'e-library'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.