पदांच्या ‘वर्षा’वामुळे कऱ्हाड ‘कमळ’मय !

By admin | Published: September 22, 2016 11:08 PM2016-09-22T23:08:16+5:302016-09-23T00:46:27+5:30

केंद्रासह राज्याला नेतृत्व देणाऱ्या कऱ्हाडवर भाजपचे लक्ष : कालेचे संग्राम माळी प्रदेश उपाध्यक्षपदी

Karhad 'lotus' is due to the rainy season! | पदांच्या ‘वर्षा’वामुळे कऱ्हाड ‘कमळ’मय !

पदांच्या ‘वर्षा’वामुळे कऱ्हाड ‘कमळ’मय !

Next

कऱ्हाड : राजकीय दृष्टिकोनातून महत्त्व असणाऱ्या अन् राज्याला काँगे्रस पक्षाच्या माध्यमातून दोन मुख्यमंत्री दिलेल्या कऱ्हाडवर भाजपने चांगलेच लक्ष केंद्रित केले आहे. देशात अन् राज्यात भाजपची सत्ता येताच राज्यमंत्री दर्जाचे सहकार परिषदेचे अध्यक्षपद, जिल्हाध्यक्षपद, प्रदेश सरचिटणीस, ऊस नियंत्रण परिषद सदस्य आदी महत्त्वाची पदे कऱ्हाडला दिली आहेत.
जिल्ह्याला मिळालेला १८ कोटी विकास निधीपैकी ८ कोटींचा ‘वर्षाव’ कऱ्हाडवर झाला आहे. त्याबरोबरच काले येथील संग्राम माळी यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केल्याने कऱ्हाडात भाजपचे कमळ फुलविण्याची जबाबदारी वाढली आहे.
गत विधानसभा निवडणुकीवेळी कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघातून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसच्या चिन्हावर रिंगणात उतरले होते. त्यांच्या विरोधात डॉ. अतुल भोसले यांनी भाजपच्या उमेदवारीवर दंड थोपटले. तर विक्रम पावसकर इच्छुक असतानाही पक्षादेश मानत त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा प्रामाणिक प्रचार केला. यात भाजपला दक्षिणेत यश आले नाही; पण केंद्राबरोबर राज्यातही भाजपचे सरकार अस्तित्वात आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांविरोधात लढलेल्या भाजपच्या नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या.
राज्य मंत्रिमंडळात चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय असणाऱ्या शेखर चरेगावकरांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली अन् कऱ्हाडला राज्य मंत्रिपदाचा लाल दिवा मिळाला. त्यानंतर संघटनात्मक पातळीवर काही बदल झाले. कऱ्हाडच्या अ‍ॅड. भरत पाटील यांच्या जागी कऱ्हाडच्याच विक्रम पावसकरांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली. भरत पाटील यांची प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य म्हणून तर डॉ. अतुल भोसले यांची प्रदेश चिटणीसपदी निवड झाली. भाजपच्या ताब्यात असलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांची शासनाच्या ऊस दर नियंत्रण समितीवर सदस्य म्हणून निवड झाली. या सगळ्या निवडीमुळे येथील कार्यकर्ते चांगलेच चार्ज झाले.
विक्रम पावसकर यांनी जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विकास निधीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्याला गत महिन्यात यश आले. जिल्ह्याला १८ कोटींचा विकास निधी मिळाला. पैकी ८ कोटी कऱ्हाडसाठी आहे हे विशेष.
त्याचबरोबरच काही दिवसांपूर्वी मूळचे कालेचे असणारे व व्यवसायानिमित्त पुणे येथे कार्यरत असणारे संग्राम माळी यांची प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली आहे. यावेळी खासदार संजय काकडे, आमदार भीमराव तपकिरे उपस्थित होते. तालुक्याला भाजपने आणखी एका पदाची जबाबदारी दिली, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. संग्राम माळी हे राष्ट्रीय माळी समाज युवक महासंघाचे उपाध्यक्ष आहेत. गेल्या दोन वर्षांत या संघाच्या वतीने राज्यातील ६ लाखांवर युवकांचे संघटन जोडण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. कऱ्हाड तालुक्याबरोबर पुणे येथेही त्यांचे कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची निवड महत्त्वपूर्ण मानली जाते.
त्यांच्या या निवडीमुळे भाजपने कऱ्हाडला झुकते माप दिल्याचे मानले जाते; पण त्याबरोबर कऱ्हाड तालुकाच नव्हे तर जिल्हा भाजपमय करण्याची जबाबदारी या साऱ्यांची आहे. ते कशी पार पाडणार यासाठी काही वेळ वाट पाहावी लागेल. (प्रतिनिधी)


भाजपतर्फे पी. व्ही. सिंधूचा होणार सत्कार
पुणे येथे ३ आॅक्टोबर रोजी आॅलिम्पिक स्पर्धेतील विजेती पी. व्ही. सिंधू यांचा सत्कार सोहळा भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या भव्य सोहळ्याच्या नियोजनाची जबाबदारी संग्राम माळी यांच्यावर देण्यात आली असून, खासदार संजय काकडे, आमदार भीमराव तपकिरे यांच्या सहकार्यातून ते याच्या नियोजनाची तयारी करीत आहे.


मी व्यवसायानिमित्त पुण्यात असलो तरी माझी कऱ्हाडची नाळ मी तुटू दिलेली नाही. मला प्रदेश उपाध्यक्षपद देऊन भाजपने माझ्यावर विश्वास दाखविला आहे. पुण्याबरोबरच कऱ्हाड तालुक्यात भाजप बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. विशेषत: माळी समाजातील जास्त लोकांना भाजपमध्ये सामावून घेण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.
- संग्राम माळी, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप

Web Title: Karhad 'lotus' is due to the rainy season!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.