कऱ्हाड -- ३,७५४ शाळांमध्ये ‘मोदींचा इव्हेंट’

By admin | Published: September 5, 2014 10:26 PM2014-09-05T22:26:11+5:302014-09-05T23:27:31+5:30

शिक्षक दिन : इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे पंतप्रधानांचे ऐकले विद्यार्थ्यांनी भाषण

Karhad - Modi's event in 3,754 schools | कऱ्हाड -- ३,७५४ शाळांमध्ये ‘मोदींचा इव्हेंट’

कऱ्हाड -- ३,७५४ शाळांमध्ये ‘मोदींचा इव्हेंट’

Next

कऱ्हाड : ‘मुलांनो ! जास्तवेळ टीव्ही़ पाहू नका, अभ्यास भरपूर करा, होमवर्क पूर्ण करून आणा...’ अशा ढिगभर सूचना देणाऱ्या शिक्षकांनी आज शाळेत चक्क ऊसना टीव्ही़ आणला. शेजारच्या डिशवरून तात्पुरते ‘कनेक्शन’ही जोडून घेतले़ कारण त्यांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तास मुलांना ऐकवायचा होता़ मोदींचे १५ मिनीटांचे भाषण ऐकून विद्यार्थी मात्र, खूष झाल्याचे पहावयाला मिळाले़ पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो़ यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सर्व विद्यार्थ्यांना दाखवावे, असे आवाहन शाळांना करण्यात आले होते़ त्यावेळेपासून शालेय व्यवस्थापनाची धावपळ सुरू होती़
आजचं युग हे महिती तंत्रज्ञानाचं असलं तरी, संगणक संच बऱ्याच शाळेत पोहोचले असले तरी आजही अनेक शाळांत टीव्ही मात्र नाही़ मग काय, एरव्ही टीव्हीबघू नका असे विद्यार्थ्यांना सांगणारे शिक्षकच घरातला, शेजाऱ्याचा टीव्हीघेऊन आज शाळेत आले़ शेजाऱ्याची केबल अथवा डिश वरून कनेक्शनही त्यांनी जोडून घेतले़ दुपारी दोन वाजल्यापासूनच टीही ठेवलेल्या सभागृहात विद्यार्थ्यांची ‘हाताची घडी अन तोंडावर बोट’ पहायला मिळाले़; पण शेवटी विद्यार्थी ते विद्यार्थीच त्यांची चूळबूळ सुरू झाली़ अन् सरतेशेवटी कार्यक्रम सुरू झाला़ सुरूवातीला टीव्हीवर छोट्या मुलांची छान भाषणंही विद्यार्थ्यांनी ऐकली नंतर नरेंद्र मोदींचे भाषणही ऐकले़ नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी साधलेला संवादही सर्वांना भावला़ अन शेवटी मोदी सरांनी दिवसभरातून चार वेळा तरी विद्यार्थ्यांच्या अंगातून घाम आला पाहिजे, त्यासाठी भरपूर खेळा, असे सांगितलंय, हे त्यांनी आपल्या शिक्षकांना आवर्जून सांगितले ! (प्रतिनिधी)

टीव्ही, रेडिओवरुनही प्रक्षेपण : जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग सक्रिय ---वीज गुल झाल्याने जनरेटरचा वापर---टीव्हीवरील धूळ झटकली...---पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण शाळांनी विद्यार्थ्यांना ऐकवावे अशा सूचना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक शाळांतील टीव्ही धूळखात पडून होते. पंतप्रधानांच्या या संदेशाच्या निमित्ताने ते टीव्ही दुरुस्त करण्यात आले किंवा त्यावरील धूळ झटकण्यात आली. काही शाळांनी नवीन टीव्ही, रेडिओ खरेदी केले.

दालवडीत प्रोजेक्टर
वाई : वाई तालुक्यातील दालवडी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना भाषण चांगले एकता यावे, यासाठी प्रोजेक्टर लावला होता.

टीव्हीत पाहून  वाजवल्या टाळ्या
मोदी यांनी हिंदीतून भाषण केले. पहिली ते चौथीच्या मुलांना फारसे समजत नव्हते. त्यामुळे विडणी येथील शाळेतील मुले टिव्हीतील मुलांनी टाळ्या वाजविल्या की, तेही टाळ्या वाजत होते. फरांदवाडी शाळेत टीव्हीची व्यवस्था होऊ शकली नाही. त्यामुळे अजित नाळे यांच्या घरात जाऊन टीव्हीवर मोदींचे विचार ऐकले.

जिल्ह्यातील ३ हजार ७५४ शाळेतील विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश ऐकविण्यात आला. शंभर टक्के शाळांनी याला प्रतिसाद दिला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांच्याबरोबर आम्ही नागठाणे येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. तेथे विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. कोडोली येथेही भेट देऊन माहिती घेतली.
प्रवीण अहिरे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

सभागृह छोटी  -अडचण मोठी
शहरातील अनेक शाळांत विद्यार्थी संख्या मोठी असल्याने टीव्हीची सोय करूनही सर्व विद्यार्थ्यांना भाषण दाखविता आले नाही़ मात्र, त्यावर उपाय म्हणून स्पिकरच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना भाषण ऐकविले, त्यामुळे विद्यार्थी खूष होते.
काही विद्यार्थी रस्त्यावर काही शाळांमध्ये मोदींचे भाषण ऐकविण्याऐवजी विद्यालयाचाच शिक्षक दिनाचा कार्यक्रम सुरू होता़ विद्यार्थी व शिक्षकांच्या मनोगतामध्येच सारे रममाण दिसत होते़ तर मोदिंचे भाषण सुरू असताना काही शाळांचे विद्यार्थी चालत घराकडे जात असल्याचेही पहायला मिळाले़

उपक्रमशिल शाळा म्हणून परिचित असणाऱ्या येथील नगरपरिषद शाळा क्रमांक तीनमध्ये मोदींच्या भाषणासाठी गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, शिक्षण विस्तार अधिकारी आनंद पळसे आवर्जुन उपस्थित होते़ मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी एका मित्राकडुन खास ४२ इंची एलसीडी, टीव्ही आणला होता़ त्यामुळे विद्यार्थ्यांना भाषण नीट पाहता आले़ यावेळी अविनाश फडतरे यांनी सर्व शिक्षकांचा सत्कारही केला़

जी. श्रीकांत यांची नागठाणे शाळेला भेट
नागठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण विद्यार्थ्यांना कितपत समजले हे पाहण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी नागठाणे शाळेला भेट दिली. त्यांनी भाषन संपल्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधत हेच भाषन मराठी समजावून सांगितला. यावेळी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे, उपशिक्षणाधिकारी तानाजी नरळे, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी धनंजय चोरडे यांच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.

Web Title: Karhad - Modi's event in 3,754 schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.