कऱ्हाडचे पोलीस निरीक्षक ‘हॉटसीट’वर!

By Admin | Published: March 25, 2015 10:47 PM2015-03-25T22:47:54+5:302015-03-26T00:06:27+5:30

पोलीस ठाण्यात बदलाचे वारे : ‘पाटील’ रजेवर, ‘म्हेत्रे’ हजर; सतरा वर्षांत बारा कारभारी; नूतन निरीक्षकांसमोर गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान

Karhad Police Inspector 'Hotseet'! | कऱ्हाडचे पोलीस निरीक्षक ‘हॉटसीट’वर!

कऱ्हाडचे पोलीस निरीक्षक ‘हॉटसीट’वर!

googlenewsNext

संजय पाटील - कऱ्हाड -येथील शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदाची खुर्ची म्हणजे ‘हॉटसीट’. आजपर्यंत या खुर्चीवर अनेक अधिकारी बसले. त्यातील काहीनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं; पण काहीना या ‘हॉट’ खुर्चीचा चांगलाच ‘चटका’ बसला. कायदा, सुव्यवस्था राबवताना ते स्वत:च वादात सापडले. ‘तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ’ ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांचेही कधी-कधी येथे हात भाजलेत. सध्याही शहर पोलीस ठाण्यात बदलीचे वारे वाहतायत. ‘पाटील’ रजेवर गेल्याने खुर्चीचा कार्यभार ‘म्हेत्रें’कडे सोपविण्यात आलाय. मुळात निरीक्षक म्हेत्रे हे मितभाषी. त्यामुळे या खुर्चीवर बसून शहरातील कायदा, सुव्यवस्था सांभाळताना त्यांना कसरत करावी लागणार, हे नक्की.
कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदाची जबाबदारी आजपर्यंत अनेक अधिकाऱ्यांनी सांभाळली. प्रत्येकानेच आपापल्या पद्धतीने शहरात कायदा, सुव्यवस्था राबविण्याचा प्रयत्न केला; पण ‘धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय’ अशीच शहराची अवस्था. त्यामुळे कोणती परिस्थिती कशी हाताळावी, हेच कधी-कधी अधिकाऱ्यांना समजत नाही आणि समजलंच तरी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय ती परिस्थिती त्यांना तशी हाताळता येत नाही. परिणामी, अधिकाऱ्यांचा अक्षरश: ‘ढोल’ होतो. त्यांना दोन्ही बाजंूकडून बडवलं जातं. या परीक्षेत जे अधिकारी ‘पास’ झाले ते टिकले; पण ज्यांनी ‘नमनालाच घडाभर तेल ओतलं’ त्यांना सर्वांच्याच रोषाला सामोर जावं लागलं. आजपर्यंत वरिष्ठ निरीक्षक म्हणून कार्यकाल पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांना याचा अनुभव आहे, आणि जे नव्याने पदभार स्वीकारतायत त्यांनाही हा अनुभव घ्यावा लागणाराय. मुळात शहरात शांतता प्रस्थापित करायची असेल, तर अधिकाऱ्यांना तशी कामगिरी दाखवावी लागते. काम करणाऱ्या अधिकाऱ्यास कऱ्हाडकर साथ देतात; पण फक्त खुर्ची सांभाळणाऱ्या अधिकाऱ्याला नागरिकांची साथ मिळत नाही, असा आजपर्यंतचा इतिहास. त्यामुळे येथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना खुर्ची आणि कायदा-सुव्यवस्था या दोन्ही गोष्टी सांभाळाव्या लागणार.
दीड महिन्यापूर्वी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील आजारी रजेवर गेलेत. अद्यापही ते हजर झाले नाहीत. त्यामुळे शहर पोलीस ठाण्याला ‘कारभारी’च नसल्याची परिस्थिती होती. अशातच पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार कऱ्हाडच्या वरिष्ठ निरीक्षकपदी संभाजी म्हेत्रे यांची नियुक्ती करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी निरीक्षक म्हेत्रे यांनी येथील पदभार स्वीकारून माहितीही घेतली; पण शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदाची खुर्ची सांभाळताना त्यांना फक्त पोलीस ठाणे सांभाळून चालणार नाही. नागरिकांशी सुसंवाद राखण्यापासून गुन्हेगारी कारवाया थोपविण्यापर्यंतची सर्व कामगिरी त्यांना करावी लागणार आहे.
काही दिवसांपूर्वी शहर पोलीस ठाण्याच्या शांतता समितीची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत नागरिकांसह विविध संघटनांनी पोलिसांच्या भूमिकेवर आगपाखड केली. पोलीस सर्वसामान्यांना विश्वासात घेत नाहीत. त्यांच्यात मिसळत नाहीत. सन्मान राखत नाहीत, असे आरोप बैठकीत करण्यात आले. त्यातून पोलीस अधिकाऱ्यांंविषयी असलेला नागरिकांचा संताप स्पष्ट झाला. हा संताप कमी होण्यासाठी निरीक्षक संभाजी म्हेत्रे यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. तसेच पूर्वीच्या गुन्ह्यांची उकल करण्याचे कामही त्यांना करावे लागणार आहे. त्यामुळे त्यांची खरी कसोटी आहे.

कमीत कमी दोन महिने, जास्तीत जास्त तीन वर्षे

कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी ३ नोव्हेंबर १९९७ रोजी ल. बा. माळी यांची नेमणूक झाली. निरीक्षक माळी यांनीच आजपर्यंत आपला तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला आहे.
निरीक्षक पी. के. घार्गे हे १२ डिसेंबर २००० रोजी हजर झाले. ६ जून २००३ मध्ये त्यांची बदली झाली. त्याचदिवशी हजर झालेल्या आर. डी. घुगे यांनी २९ जानेवारी २००४ पर्यंत म्हणजेच फक्त सात महिने कार्यभार पाहिला.
३० जानेवारी २००४ मध्ये नेमणूक झालेल्या जे. पी. तिवटे यांनी शहर पोलीस ठाण्यात फक्त दहा महिने काढले. त्यांची बदली झाल्यानंतर एस. एम. रजपूत हजर झाले; पण तेही फक्त दोन महिन्यांसाठी.
महादेव गावडे एक वर्ष चार महिने वरिष्ठ निरीक्षक म्हणून येथे कार्यरत राहिले. २० जानेवारी २००५ ते १२ मे २००६ पर्यंतचा त्यांचा काळ कऱ्हाडची गुन्हेगारी मोडीत काढणारा ठरला. आर. एस. कामिरे यांनीही त्यांचे एक वर्ष गाजवले. २३ मे २००७ रोजी त्यांची बदली झाली.
आर. व्ही. मोहिते यांनी एक वर्ष व त्यांच्यानंतर आलेल्या संभाजी पाटील यांनी दोन वर्षे दोन महिन्यांचा कार्यकाल पूर्ण केला. संभाजी पाटील यांच्या कार्यकालात काही वादावादीचे प्रसंगही उद्भवले.
मुरलीधर मुळूक २६ आॅगस्ट २०१० रोजी रूजू झाले. २ जुलै २०१३ रोजी त्यांची बदली झाली. त्यानंतर संजय सुर्वे यांनी आठ महिने पद सांभाळले. १७ फेब्रुवारी २०१४ रोजी बी. आर. पाटील यांनी पद्भार स्वीकारला.


आधी सहायक, आता वरिष्ठ निरीक्षक
निरीक्षक संभाजी म्हेत्रे यांनी यापूर्वी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी ढेबेवाडी, ता. पाटण येथेही सेवा बजावली असून सातारा व पुण्यातही त्यांनी काम केले आहे. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी आर. व्ही. मोहिते व त्यानंतर संभाजी पाटील कार्यरत असताना संभाजी म्हेत्रे येथे कार्यरत होते.

Web Title: Karhad Police Inspector 'Hotseet'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.