कऱ्हाडात नव्या समीकरणांची नांदी! : पृथ्वीबाबा, बाळासाहेब -उदयदादा एकत्रित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:04 AM2018-05-26T00:04:56+5:302018-05-26T00:04:56+5:30
प्रमोद सुकरे ।
कऱ्हाड : गुरुवारी रात्री एका जाहीर कार्यक्रमात पृथ्वीबाबा, बाळासाहेब, उदयसिंह, आनंदरावनाना, इंद्रजितबाबा, अविनाशदादा ही सारी मंडळी एकाच व्यासपीठावर दिसली. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून टिपलेली छबी काही मिनिटांतच तालुका, जिल्हा अशी सर्वदूर पसरली. कार्यक्रम कोणताही असो; पण पृथ्वीबाबा आणि उदयसिंह यांचं एका व्यासपीठावर येणं, ही नव्या राजकीय समीकरणांची नांदी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.
शेणोली, ता. कऱ्हाड येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा शताब्दी महोत्सव साजरा झाला. या कार्यक्रम पत्रिकेवर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विलासराव पाटील यांचा उल्लेख होता. याशिवाय राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील, आमदार विश्वजित कदम, कृष्णेचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते, अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर आदींच्या नावांचा समावेश होता.
ही निमंत्रण पत्रिका छापल्यापासूनच उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. कोणी म्हणे उंडाळकर येणार नाहीत. तर कोणी म्हणे येणारच. कार्यक्रमाला विलासराव पाटील आले नसले तरी त्यांचे राजकीय वारसदार अॅड. उदयसिंह पाटील वेळेत हजर होते. एकाच व्यासपीठावर त्यांना एकत्रित पाहिल्यानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल झाले. बघता बघता राजकीय चर्चांना ऊत आला.
सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील शेणोलीत पोहोचले. त्यापाठोपाठ अॅड. उदयसिंह पाटीलही दाखल झाले.
मात्र पृथ्वीबाबांची त्यांना वाट पाहावी लागली. त्यावेळी बाळासाहेब व उदयसिंह यांची चाललेली चर्चा अनेकांनी दुरूनच पाहणे पसंद केले. काही वेळाने पृथ्वीबाबांची गाडी आली. त्यांची उघड्या जीपमधून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ते व्यासपीठावर आल्यानंतर कार्यक्रम सुरू झाला. स्वागत समारंभ संपल्यावर मान्यवरांची भाषणे झाली; पण एकानेही राजकीय भाष्य केले नाही. तर साऱ्यांनीच ‘राग’ सहकार आळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या साऱ्यांच एकाच व्यासपीठावर एकत्रित येणं बरंच काही सांगून जाते, अशी चर्चा जाणकार करीत आहेत. शेणोलीतील या कार्यक्रमाची सध्या जिल्हाभर चर्चा आहे.
दादांचे मनोगत नाही
कार्यक्रमाला झालेला उशीर आणि पूर्वनियोजित दुसरा कार्यक्रम असल्याने अॅड.
उदयसिंह पाटील यांनी मधूनच साºयांचा निरोप घेतला. त्यामुळे त्यांचे मनोगत झाले नाही.
तर दुसरे दादा अविनाश मोहिते यांची व्यासपीठावर उपस्थिती असूनही त्यांचे भाषण
झाले नाही.
... तरीही इंद्रजितबाबा हजर
वास्तविक, संयोजकांनी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेवर कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते (बाबा) यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. मात्र, तरीही या कार्यक्रमास इंद्रजित मोहिते यांनी हजेरी लावून सहकारावर मनोगत व्यक्त केले.
असे झाले दीपप्रज्वलन...
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पृथ्वीबाबांनी दीपप्रज्वलन केल्यावर मेणबत्ती उदयदादांच्या हातात दिली. त्यांनी ती मेणबत्ती बाळासाहेबांच्या हातात दिली. ही कृती सर्वसामान्य असली तरी उपस्थित याकडे बारकाईने पाहत होते.
शेणोलीकरांचे कौतुक
राजकारणात एकमेकांचे विरोधक म्हणजे विळ्या भोपळ्याचे सख्ख्य; पण या विरोधकांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे काम शेणोलीकरांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने केले. हे करताना त्यांनी सुरुवातीला गावातील गटतट मिटवले. साहजिकच नेत्यांनीही याचे अनुकरण करावे, अशी त्यांची अपेक्षा असणार.