‘कऱ्हाड दक्षिण’, माणसाठी राष्ट्रवादीची स्वतंत्र रणनीती
By Admin | Published: October 1, 2014 10:03 PM2014-10-01T22:03:35+5:302014-10-02T00:16:22+5:30
शशिकांत शिंदे : साताऱ्यात झाली खलबते
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसने ‘कऱ्हाड दक्षिण’ आणि ‘माण’ विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र रणनीती आखल्याचा दावा करतच ती आपल्याला योग्य वेळी कळेलच, असे माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, राजेंद्र यादव यांनी कऱ्हाड उत्तरमधून उमेदवारी अर्ज मागे घेतल्याबाबत त्यांना अधिक छेडले असता त्यांनी पक्षश्रेष्ठी तीन ते चार दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी भवनात विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस रामराजे नाईक-निंबाळकर, शशिकांत शिंदे, खा. उदयनराजे भोसले, आ. प्रभाकर घार्गे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आ. सदाशिवराव पोळ, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांची उपस्थिती होती.
‘कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र यादव यांनी पक्ष नेतृत्वाच्या सुचनेप्रमाणे अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार येथे असणार नाही. मात्र, येथे राष्ट्रवादीने कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय आमचे पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. त्यानुसार आम्ही आमची भूमिका जाहीर करू.’
राष्ट्रवादीचा उमेदवार या मतदारसंघात नाही. याचाच अर्थ आपण अपक्ष उमेदवार उंडाळकरांना बाय देत असल्याचा होतो, अशी विचारणा केली असता त्यांनी स्मितहास्य करतच नकार दिला आणि आपल्याला जे काय अंदाज बांधायचे आहेत ते बांधू शकता, असे प्रतिउत्तरही दिले.
शिंदे म्हणाले, ‘आपचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सभांचेही नियोजन केले आहे. त्याचबरोबर प्रत्येक मतदारसंघात स्वत: खासदार उदयनराजे भोसले प्रचार करणार आहेत. माणमध्येही आम्ही त्यांच्या सभा ठेवल्या आहेत. त्याचा कार्यक्रमही तयार झाला आहे.’
दरम्यान, पक्षनेतृत्वाच्या सांगण्यानुसार राजेंद्र यादव यांनी माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादी पक्ष त्यांचा योग्य तो सन्मान राखणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. मात्र, आपण ‘कऱ्हाड दक्षिण’मध्ये अपक्ष उमेदवार उंडाळकरांना राष्ट्रवादी पाठिंबा देणार का, या विषयावर मात्र, त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. आम्हाला (राष्ट्रवादी) वाटले म्हणून आम्ही उमेदवार बदलला, असे त्यांनी स्पष्ट करत असतानाच पत्रकारांनी त्यांना रोखले आणि याचाच अर्थ आपण विलासराव पाटील-उंडाळकरांना सहकार्य करणार असा होतो, अशी विचारणा केली असता थोड्याच दिवसांत आम्ही ‘कऱ्हाड दक्षिण’च्या अनुषंगाने उमेदवारी जाहीर करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
राजेंद्र यादव दोन दिवस आऊट आॅफ कव्हरेज
राष्ट्रवादी भवनातून मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र यादव माघार घ्यायला तयार नव्हते. त्यांना ज्यावेळी माघारीचा निरोप देण्यात आला त्यावेळी राजेंद्र यादव यांनी मला अगोदरच उमेदवारी का दिली, असा सवाल केला. मात्र, आपणाला उमेदवारी मागे घ्यावीच लागेल, असे बजावण्यात आले. राजकारणातील काही गणिते समजून घेत चला. पक्ष आपली योग्यवेळी दखल घेणारच आहे. त्यामुळे आपल्याला पक्ष जी सूचना करत आहे, त्यानुसार कार्यवाही करत चला, असेही सांगण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, गेले दोन दिवस त्यांचा मोबाईलही बंद होता. मात्र, त्यांच्यांशी संपर्क साधण्याची जबाबदारी उदयनराजेंवर देण्यात आली आणि यादव अखेर उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार झाले.
पदे मिळाली तर न्याय, नाहीतर अन्याय...
माण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अनिल देसाई यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या टीकोचा समाचारही शिंदे यांनी केला. ते म्हणाले, ‘अनिल देसाई यांच्या वक्तव्यावर संशोधन करावे लागेल. कार्यकर्त्यांची उंची पक्षामुळे वाढते. ही बाब त्यांनी लक्षात घ्यावी. राष्ट्रवादीने त्यांना भरपूर दिले. कालपर्यंत त्यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद हवे होते. पदे मिळाली तर आम्ही चांगले आणि नाही मिळाली तर आम्ही वाईट. त्यांची ही कृती योग्य नाही.’