कऱ्हाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा!
By Admin | Published: September 8, 2015 10:03 PM2015-09-08T22:03:08+5:302015-09-08T22:03:08+5:30
सभागृहात एकमुखी ठराव: अधिकाऱ्यांवर सदस्यांचे ताशेरे; अधिकारी व सदस्यांमध्ये खडाजंगी --पंचायत समितीमासिक सभा
कऱ्हाड : दुष्काळी भागाबाबत विचार केल्यास मराठवाड्यात सर्वात जास्त दुष्काळ पडला आहे. असे सर्वचजण म्हणतात. मात्र, सातारा जिल्ह्यातही दुष्काळ पडला आहे. मराठवाड्यात ५५ टक्के पाऊस पडला तर त्याठिकाणी शासन दुष्काळ जाहीर करत असेल तर सातारा जिल्ह्याने काय केले आहे. जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यात तर ३०.९० टक्के इतकाच पाऊस पडला आहे. तरी सुद्धा या तालुक्याला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले जात नाही. जिल्हावार दुष्काळ जाहीर न करता तो तालुकावार पद्धतीने जाहीर करत कऱ्हाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा. असा एकमुखी ठराव कऱ्हाड पंचायत समितीच्या मासिक सभेत घेण्यात आला. तसेच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सभेत सदस्यांसह सभापतींनी ताशेरे ओढले. कऱ्हाड पंचायत समितीची मासिक सभा सोमवारी यशवंतराव चव्हाण सभागृह बचतभवन येथे पार पडली. अध्यक्षस्थानी सभापती देवराज पाटील होते. तर उपसभापती विठ्ठलराव जाधव, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे उपस्थित होते.तालुका कृषी विभागाचे कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांनी कृषी विभागाचा आढावा मांडला. तालुक्यात सध्या ३०.९० टक्के इतका पाऊस पडला असल्याचे सांगत तालुक्यात खरीप हंगामातील पिके पुर्णपणे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे त्यांनी सभागृहास माहिती दिली.
शामगाव येथे चाराटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्याठिकाणी चारा छावणी उभारण्यात यावी अशी मागणी तेथील परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांनी सभेदरम्यान दिली.
व्यावसायिक वीज कर आकारणी ही विविध फरकाने वीज वितरण कंपनीने करावी अशी तरतूद असताना वीज वितरण कंपनीकडून मात्र, त्याची अंमलबजावणी केली जात नाही. तसेच उंडाळे परिसरात नादुरूस्त मीटरची संख्या वाढली आहे. तर मसूर विभागात वीज नाही, शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी नाही तसेच वीज गेल्यास वायरमन देखील नाही. अशा गैरसोयी या ठिकाणी निर्माण झाल्याने येथील शेतकऱ्यांनी अवस्था बिकट बनली आहे. अशात वीज वितरण विभागातील अधिकारी काय करत आहेत. अशा शब्दात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्यांसह सभापतींनी ताशेरे ओढले.
मसूर या ठिकाणी पाणी, वीज नसल्याने या भागातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील शेतकऱ्याची अवस्था गंभीर बनली आहे. ट्रान्सफॉर्मर जळाल्यास त्याकडे वीजवितरणच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ठराव मांडायचे कशाला, अशा शब्दात सदस्य भाऊसाहेब चव्हाण यांनी अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले.
तसेच लघुसिंचन विभागाच्या आढावावेळी तालुक्यात बंधारे बांधण्यापेक्षा कायस्वरूपी पाणी कसे टिकून राहील अशा उपाययोजना करा. अशा सुचना अधिकाऱ्यांना सदस्यांनी दिल्या.
यावेळी पशुसंवर्धन विभाग, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, शेती विभाग, लघुसिंचन विभाग, रोपवन विभाग, सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एस टी महामंडळ विभागाच्या अधिकाऱ्यांनी आढावा सादर केला. (प्रतिनिधी)
मराठवाड्यात विमाने फिरत असतील तर साताऱ्यात का नाही ?
संपूण राज्यात दुष्काळ निर्माण झाला आहे. राज्य सरकारने मराठवाड्यात दुष्काळ पडला म्हणून पाऊस पाडण्यासाठी त्या ठिकाणी विमाने सोडली. राज्यामध्ये सातारा जिल्ह्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. याही जिल्ह्यात दुष्काळ पडला आहे. मग सातारा जिल्ह्यात पाऊस पाडण्यासाठी विमान फिरवायला पाहिजे, अशी मागणी पंचायत समितीच्या सोमवारी झालेल्या मासिक सभेत सदस्यांनी केली.
ठराव काय ग्रामपंचायतीतर्फे देऊ का ?
सामान्य शेतकऱ्यांच्या तक्रारी व समस्या अधिकाऱ्यांपुढे सदस्यांकडून अनेकवेळा मांडून देखील त्याकडे त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जाते. पंचायत समितीकडून वारंवार प्रलंबित कामाबाबत ठराव मांडूनही देखील काही होत नसेल तर आता काय ग्रामपंचायतीचे ठराव द्यायला हवेत काय ? अशा शब्दात पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब चव्हाण यांनी विजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
तालुक्यात ब्रिटीशकालीन बंधारे किती आहेत ?
पंचायत समितीच्या सोमवारी झालेल्या मासिक सभेत लघुसिंचन विभागाचे ओगलेवाडीचे उपविभागीय अधिकारी हे आपल्या विभागाचा आढावा मांडण्यासाठी आले असता. त्यांच्यावर सभापतींसह सदस्यांनी चांगलेच ताशेरे ओढले. आढाव्यावेळी सदस्यांनी अधिकाऱ्यांना तालुक्यात ब्रिटीशकालीन बंधारे किती आहेत? अशी विचारणा केली असता अधिकाऱ्यांना प्रश्नाचे उत्तर देता आले नाही.