कऱ्हाड : विद्यानगरला बिनदप्तराची शाळा-सगाम शाळेचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 12:53 AM2018-12-06T00:53:23+5:302018-12-06T00:54:28+5:30
नुकतेच केंद्र शासनाने मुलांचे दप्तरांचे ओझे कमी करण्याबाबत एक अध्यादेश जारी केला. तथापि मुलांना कितीही सांगितले तरी ते दररोज नको त्या वह्या, पुस्तके भरलेले दप्तर घेऊन शाळेत येतात.
कऱ्हाड : नुकतेच केंद्र शासनाने मुलांचे दप्तरांचे ओझे कमी करण्याबाबत एक अध्यादेश जारी केला. तथापि मुलांना कितीही सांगितले तरी ते दररोज नको त्या वह्या, पुस्तके भरलेले दप्तर घेऊन शाळेत येतात. मुलांवर पडत असलेले दप्तराचे ओझे कमी कसे करायचे? हा प्रश्न अनेक शाळांना पडलेला आहे. यावर उपाय म्हणून रयत शिक्षण संस्थेचे गाडगे महाराज प्राथमिक शाळेत ‘बिनदप्तराची शाळा’ ही संकल्पना राबविली गेली आहे. या संकल्पनेमुळे आज विद्यार्थी दप्तराशिवाय शाळेत येत आहेत.
विद्यानगर येथील गाडगे महाराज प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या वर्गात मुलांना डिजिटल शिक्षण दिले जाते. ‘चॉक अँड टॉक’ याला फाटा देत आता खडूशिवाय लिहिता येणारा हा ‘टच स्क्रीन’ बोर्डही वर्गात बसविण्यात आला आहे. शिवाय या बोर्डच्या वापराबाबत ‘रयत’मार्फत प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
या प्रणालीद्वारे दिलेल्या जाणाऱ्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना शाळेत कोणत्याही विषयाची पाठ्यपुस्तके आणण्याची आवश्यकता राहिली नाही. विद्यार्थ्यांना मिळालेली मोफत पाठ्यपुस्तके मुलांना घरच्या अभ्यासासाठी घरीच ठेवण्यास सांगितले आहे. ऐवढेच नाही तर मुलांना दप्तरदेखील आणण्यास प्रतिबंध केला आहे.
शाळेत येताना मुले पाठीवरच्या दप्तरामध्ये प्रमाणापेक्षा जास्त वह्या व पुस्तकेही भरली जातात. त्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी बिनदप्तराची शाळा ही संकल्पना आखली आहे.
एकाच पिशवीत डबा, एक वही अन् पेन
आज विद्यार्थी डब्याच्या पिशवीतच सर्व विषयांसाठी एकच वही, एक पेन व जेवणाचा डबा एवढेच साहित्य शाळेत घेऊन येत आहेत. त्यामुळे त्यांना शाळेत येताना ओझे असलेले दप्तर घेऊन येण्याची आवश्यकता राहिलेली नाही.
‘दप्तराचे ओझे’ या समस्येवर आम्ही प्रभावी उपाययोजना करत असून, ‘बिनदप्तराची शाळा’ हा त्यापैकीच एक भाग आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेला हा उपक्रम आता इतर वर्गांसाठी देखील राबवित आहोत.
- सुनीता जाधव, मुख्याध्यापिका,
सद्गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळा