कऱ्हाड पालिकेने जाणली स्मृतिस्तंभाची व्यथा!

By admin | Published: October 25, 2015 09:15 PM2015-10-25T21:15:03+5:302015-10-25T23:49:02+5:30

कार्वे नाका परिसरात स्वच्छता : आॅलिम्पिक बोधचिन्हाच्या चौकातील खड्डे मुजविले; डागडुजीसाठी कर्मचाऱ्यांना सूचना--लोकमतचा प्रभाव

Karhad was aware of the pain of memory! | कऱ्हाड पालिकेने जाणली स्मृतिस्तंभाची व्यथा!

कऱ्हाड पालिकेने जाणली स्मृतिस्तंभाची व्यथा!

Next

कऱ्हाड : कऱ्हाडच्या मातीत जन्मलेले व देशाला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिले कास्य पदक मिळवून देणारे आॅलिम्पिकवीर दिवंगत खाशाबा जाधव यांच्या कुस्तीमधील पराक्रमाची आठवण म्हणून कार्वे नाका येथे पालिकेने स्मृतिस्तंभ उभारला; मात्र उभारणीनंतर या स्मृतिस्तंभाकडे पालिकेने पाठ फिरविली. अनेक दिवसांपासून या स्तंभावर धुळीचा थर साचत राहिला. स्मृतिस्तंभाच्या या व्यथा ‘लोकमत’ने मांडल्यानंतर आता पालिकेला जाग आली आहे. पालिकेने स्तंभाच्या परिसराची स्वच्छता केली असून, रस्त्याची डागडुजीही केली आहे. मात्र, येथील नळ कनेक्शन बंद असल्यामुळे बागेची दुरवस्था झाली असून, पालिकेने त्याबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे. कार्वे नाका येथे ४५ लाख खर्च करून एक स्मृतिस्तंभ व पाच रिंंगांचे आॅलिम्पिक बोधचिन्ह उभारण्यात आले आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त मंजूर अनुदानातून विकसित करण्यात आलेल्या या दोन स्मृतींची देखभाल मात्र पालिका काळजीपूर्वक करत नसल्याचे दिसत होते. स्मृतिस्तंभ उभारल्यानंतर काहीच दिवसांत पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, या स्तंभाची दुरवस्था सुरू झाली.
वास्तविक, या स्मृतिस्तंभाने कऱ्हाडच्या वैभवात भर पडली आहे. मात्र, पालिकेच्या दुर्लक्षामुळे हा परिसर बकाल झाला होता. रस्त्यात खड्डे पडले होते, तर रस्त्यावरील धूळ व घाण उडून स्मृतिस्तंभाला अवकळा आली होती. ‘लोकमत’ने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर पालिकेला जाग आली. पालिकेने स्मृतिस्तंभ परिसरातील खोदकाम मुजविले.
खडी आणि डांबर टाकून रस्ता पक्का केला.
स्मृतिस्तंभाची स्वच्छता करण्यात आली. स्मृतिस्तंभाच्या देखभाल, दुरुस्तीसह परिसर सुशोभीत करण्यासाठी आता पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांनी कर्मचाऱ्यांना सूचनाही केल्या आहेत.
स्मृतिस्तंभ परिसरात सध्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य पडून आहे. स्मृतिस्तंभ व आॅलिम्पिक बोधचिन्हाच्या सभोवताली लॉन असून, येथे पाण्यासाठी करण्यात आलेले नळ कनेक्शनही बंद आहे. हे कनेक्शन पालिका कर्मचाऱ्यांनीच मुजविले आहे.
कनेक्शनच मुजविल्याने लॉनमधील झाडांना पाणी मिळत नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाला येथील नळ कनेक्शन पूर्ववत सुरू करावे लागणार आहे. तसेच बांधकामाचे साहित्यही हटवावे लागणार आहे. स्मृतिस्तंभ उभारून त्याची काळजीपूर्वक देखभाल पालिकेकडून केली जात नसल्याने तसेच एकही नगरसेवक, लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्मृतिस्तंभ व आयलँडच्या देखभालीची जबाबदारी कऱ्हाड पालिकेकडे असून, येथील गैरसोयी व असुविधा कमी करण्यासाठी पालिकेने तसे प्रयत्न करणे गरजेचे आहे. शहरात इतरही काही महत्त्वाची पर्यटनस्थळे, उद्याने, पुतळे आहेत. त्याठिकाणी मात्र, पालिकेतील कर्मचारी न चुकता नियमित स्वच्छता करतात. अग्निशामक दलाचे कर्मचारी नियमितपणे पुतळे धुऊनही काढतात. त्याचप्रमाणे येथील बोधचिन्हाचीही स्वच्छता करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)

चौकातील खड्डे मुजवले
कार्वे नाका येथे आॅलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या स्मृतिस्तंभासमोरच पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी पालिकेकडून रस्ते खुदाई करण्यात आली होती. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण होत होते. आता मात्र पालिकेकडून खोदकाम मुजविण्यात आले असून, रस्ता तयार करण्यात आला आहे.

नागरिकच घालतात लॉनला पाणी
आॅलिम्पिक बोध चिन्हाभोवती आकर्षक लॉन आहे. लॉनला पाणी देता यावे, यासाठी सुरुवातीलाच याठिकाणी नळ कनेक्शन घेण्यात आले होते. त्याद्वारे काही दिवस पालिका कर्मचाऱ्यांनी लॉनवर पाणीही मारले; मात्र सध्या हे कनेक्शनच बंद असल्याने लॉनला पाणी मिळेनासे झाले आहे. परिसरातील काही नागरिक व रिक्षा व्यावसायिकांकडून सध्या लॉनची जपणूक होत आहे. नागरिक व रिक्षा व्यावसायिक मिळेल तेथून पाणी आणून लॉनवर टाकत आहेत.

आॅलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात आलेल्या स्मृतिस्तंभ व आॅलिम्पिक बोधचिन्हाच्या देखभालीची जबाबदारी पालिकेची आहे. या ठिकाणी असलेल्या गैरसोयीकडे व लॉनमध्ये नियमित सुविधा पुरविण्याच्या सूचना पालिकेतील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
- प्रशांत रोडे, मुख्याधिकारी
खाशाबा जाधव यांच्या स्मृतिस्तंभाच्या बांधकामानंतर सुरुवातीच्या काळात स्मृतिस्थंभ परिसरातील लॉनमधील झाडांना पालिका कर्मचारी नियमितपणे पाणी घालत होते. नंतर काही दिवसांनी कर्मचाऱ्यांनी पाणी मारणे बंद केले आहे. ते आत्तापर्यंत बंदच आहे. पाण्याअभावी लॉनमधील झाडे, गवत वाळले आहे.
- अभिजित शिंदे, गोळेश्वर


आॅलिम्पिक बोधचिन्ह चौकात पालिकेच्या वतीने नवीन नळकनेक्शन घेण्यात आले होते. पालिकेचे कर्मचारीही पाणी लॉनवर मारत होते. कर्मचाऱ्यांकडून लॉनवर पाणी मारणे बंद झाल्यानंतर परिसरातील रहिवासी व दुकानदार, रिक्षाचालक पाणी मारत होते; मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ते नळ कनेक्शनच मुजवून टाकले आहे.
- संजय पाटील, कार्वे नाका

Web Title: Karhad was aware of the pain of memory!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.