कऱ्हाडला धान्य मार्केट होणारच!
By admin | Published: July 3, 2016 11:59 PM2016-07-03T23:59:51+5:302016-07-03T23:59:51+5:30
शिवाजीराव जाधव : कृषी प्रदर्शनातील शंभर स्टॉल विविध संस्थांना दिले
कऱ्हाड : ‘शेती उत्पन्न बाजार समितीचे चोवीस कोटी रुपयांचे धान्य मार्केट रद्द केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तो चुकीचा असून, वास्तविक कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी धान्य मार्केट हे सुरू केलेच जाणार आहे. याउलट आता सुनील पाटील यांनी आपल्या कार्यकाळात संचालकांच्या मीटिंगमध्ये सात प्लॅटचे विषय कसे काय मंजूर केले. याचा खुलासा त्यांनी द्यावा, आमच्यावर बिनबुडाचे आरोप करू नये,’ अशी माहिती बाजार समितीचे सभापती शिवाजीराव जाधव यांनी दिली.
कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे उपसभापती आत्माराम जाधव, संचालक अशोक पाटील, महादेव देसाई, विजय कदम, मोहनराव माने आदी उपस्थित होते.
यावेळी सभापती जाधव म्हणाले, ‘धान्य मार्केट हे आम्ही रद्द केलेले नाही. याउलट आम्हीच २००७ रोजी धान्य मार्केटचा प्लॅन आणला होता. मात्र, सुनील पाटील यांची बॉडी बाजार समितीत आल्याने त्यांनी हा प्लॅन रद्द केला.
बाजार समितीच्या आवारात धान्य मार्केटच्या उभारणीकरिता १६ आॅगस्ट २०११ रोजी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ५ कोटी ८१ लाख अनुदान मंजूर झाले होते. तर ३१ आॅक्टोंबर २०१४ अखेर या जागेत कामकाज का सुरू केले नाही. या कामाचे साधे भूमिपूजनही न करता १८ लाख ४४ हजार रुपये अॅडव्हान्स रक्कम ठेकेदाराला का दिली. तसेच बाजार समितीचा २०१२-१३ या आर्थिक वर्षात लेखापरीक्षण अहवाल पाहता समितीमध्ये विकास कामाच्या नावाखाली अंदाजे ५८ लाख ५६ हजार खर्च केले आहेत. परंतु या खर्चास कृषी पणन मंडळ अथवा पणन संचालक यांची मान्यता नसताना ही कामे आपल्या अधिकारात करून समितीच्या रक्कमेचा अपहार केल्याचे दिसून येते.’ (प्रतिनिधी)
राज्यात ९८ संस्थांचे प्रभारी सचिवांच्या सहकार्याने कामकाज
राज्यातील ९८ शेती उत्पन्न बाजार समितीच्या या सद्यस्थितीला प्रभारी सचिवांंच्या सहकार्याने काम करत आहेत. राज्यातील बाजार समितीमधील सचिवांची प्रकरणे आजही प्रलंबित आहेत. सध्या कऱ्हाडच्या शेती उत्पन्न बाजार समितीला सचिव नेमण्याबाबत शासनाकडे मागणी केली असल्याची माहिती सभापती शिवाजीराव जाधव यांनी दिली.
व्यापारी असोसिएशनच्या मागणीमुळे कोयना बँकेला जागा दिली
मार्केट यार्ड परिसरात कोयना सहकारी बँक यावी, अशी मागणी ही व्यापारी असोसिएशनकडून आल्यानंतर आम्ही बँकेला जागा देण्याचा निर्णय घेतला. वास्तविक पाहता या ठिकाणी बँकेची गरज आहे, अशी माहिती सभापती शिवाजीराव जाधव यांनी दिली.
बाजार समितीला दीड लाखाचे अधिक उत्पन्न...
गेल्या पाच वर्षांपासून यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन भरवले जात होते. या ठिकाणी कृषी प्रदर्शनातून तसा नफाही मिळत होता. मात्र, यावर्षी नव्याने सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांना शंभर मोफत स्टॉल देण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्याप्रमाणे प्रदर्शनातील मोफत स्टॉल हे विविध संस्थांना दिले आहेत. त्याची यादीही आमच्याकडे आहे. यावर्षी प्रदर्शनातून ८ लाख ५१ हजार रुपये शुअर शॉट कंपनीने बाजार समितीला मिळवून दिले आहेत. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत दीड लाख रुपये जास्त उत्पन्न बाजार समितीला मिळालेले आहे, अशी माहिती संचालक अशोक पाटील-पोतलेकर यांनी दिली.