कऱ्हाडातील कचरा संकलन ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:24 AM2021-07-12T04:24:20+5:302021-07-12T04:24:20+5:30
कऱ्हाड : शहरातील घंटागाड्यांच्या नवीन निविदेची वर्क ऑर्डर तयार आहे. मात्र, त्या ठरावावर स्वाक्षऱ्या झाल्या नसल्याने, शहरातील कचरा गोळा ...
कऱ्हाड : शहरातील घंटागाड्यांच्या नवीन निविदेची वर्क ऑर्डर तयार आहे. मात्र, त्या ठरावावर स्वाक्षऱ्या झाल्या नसल्याने, शहरातील कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्या बंद आहेत. परिणामी, शहरातील बहुतांश ठिकाणचे कचरा संकलन बंद पडले असून, कचऱ्याचे ढीग लागत आहेत.
कचरा संकलनासाठी नवीन ठेकेदाराच्या वर्क ऑर्डरच्या ठरावावर स्वाक्षरी नसल्याने, त्यांना प्रत्यक्ष वर्क ऑर्डर मिळालेली नाही, तर जुन्या ठेकेदाराची मुदत संपल्याने कचरा संकलनाची प्रक्रियाच बंद पडली आहे. पालिकेच्या १८ घंटागाड्यांसह तीन ट्रॅक्टरद्वारे कचरा गोळा केला जातो. मात्र, घंटागाड्याच बंद असल्यामुळे शहरातून कित्येक टन कचरा गोळा केला गेलेला नाही, तर रस्ते सफाई व गटार स्वच्छ करण्याचे कामही झालेले नाही. संबंधित कर्मचारीही कामावर जाऊ शकले नाहीत. आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी कर्मचाऱ्यांना विनंती केली. मात्र, कर्मचाऱ्यांनी जबाबदारीचा मुद्द्यापुढे केल्याने त्यांनाही काही बोलता आले नाही. त्यामुळे शहरात घंटागाड्या न फिरल्याने, घरोघरचा कचरा तसाच पडून राहिला आहे. वर्क ऑर्डर तयार आहे. मात्र, ठरावावर नगराध्यक्षांनी स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ केली असल्याने, हा प्रश्न उद्भवला असल्याचे आरोग्य सभापती वाटेगावकर यांनी स्पष्ट केले. ३० जून रोजी जुन्या ठेकेदाराची मुदत संपली आहे. जुन्या ठेकेदाराला दहा दिवसांची मुदतवाढ आहे. नवीन ठेकेदाराची प्रक्रिया पूर्ण आहे. त्याची वर्क ऑर्डरही तयार आहे. मात्र, त्याच्या ठरावावर नगराध्यक्षांनी स्वाक्षरी न केल्याने कचरा उचलला गेला नाही. ही स्थिती योग्य नाही. वेळीच ठरावावर स्वाक्षरी होणे गरजेचे आहे, असेही विजय वाटेगावकर यांनी सांगितले.