कऱ्हाडला ‘हम सात-सात’चा नारा!
By admin | Published: March 14, 2017 10:50 PM2017-03-14T22:50:51+5:302017-03-14T22:50:51+5:30
पंचायत समिती : राष्ट्रवादीच्या शालन माळी सभापती; उपसभापतिपदी विकास आघाडीचे रमेश देशमुख
कऱ्हाड : पंचायत समिती सभापती, उपसभापतिपदाच्या निवडी मंगळवारी झाल्या. राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील व काँग्रेसचे माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांनी ‘हम सात-सात है’ म्हणत गळ्यात गळे घातल्याने राष्ट्रवादीच्या शालन माळी यांची सभापतिपदी तर उंडाळकरांच्या तालुका विकास आघाडीचे रमेश देशमुख यांची उपसभापतिपदी निवड झाली.
कऱ्हाड पंचायत समितीत सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याच पक्ष किंवा नेत्याकडे बहुमत नसल्याने मंगळवारी होणाऱ्या सभापती, उपसभापती निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर व भाजपचे डॉ. अतुल भोसले उत्सुक होते. बाळासाहेब व उंडाळकर यांच्याकडे प्रत्येकी सात सदस्य संख्या होती. तर भाजपकडे सहा सदस्य होते. त्यामुळे कोणातरी दोघांना एकत्रित आल्याशिवाय गत्यंतर नव्हते. ‘हम सात-सात है’ की ‘मैत्रिपर्वाला’ उजाळा याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, मंगळवारी आजी-माजी आमदारांनी सात अधिक सात अशी बेरीज करीत सत्ता तर स्थापन केली.
सकाळी ११ वाजता राष्ट्रवादीच्या वतीने सभापतिपदासाठी शालन माळी यांचा तर उंडाळकर आघाडीच्या वतीने रमेश देशमुख यांचा अर्ज दाखल करण्यात आला. याचवेळी भाजपच्या वतीने सभापतिपदासाठी अर्चना गायकवाड यांचा तर उपसभापतिपदासाठी शुभांगी पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला. काँग्रेसकडे सभापतिपदासाठी आवश्यक उमेदवार नसल्याने नामदेव पाटील यांनी उपसभापतिपदासाठी अर्ज दाखल केला होता. (प्रतिनिधी)