कऱ्हाडची करवसुली बारा कोटी!

By admin | Published: March 27, 2016 09:29 PM2016-03-27T21:29:16+5:302016-03-27T21:29:16+5:30

पालिकेकडून वसुलीचा धडाका : फलक अन् बँड बाजामुळे नागरिकांची पालिकेत गर्दी; अजूनही चार दिवस अवधी; सरासरी ६५ टक्के वसुली

Karhadi tax collection is twelve crore! | कऱ्हाडची करवसुली बारा कोटी!

कऱ्हाडची करवसुली बारा कोटी!

Next

कऱ्हाड : नव्वद टक्के वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पालिकेकडून सध्या युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. पालिकेने राबविलेल्या वसुलीच्या कारवाईमुळे आत्तापर्यंत तब्बल बारा कोटी थकबाकीची वसुली पालिकेत जमा झाली आहे.
पालिकेचे यावर्षीचे वसुलीचे उद्दिष्ट हे ६५ टक्के पूर्ण झाले असून, आत्तापर्यंत मंडईतील दहा गाळ्यांसह ३५ गाळ्यांना सील ठोकण्यात आले आहेत. तर सहा मोबाईल टॉवर, ३२ नळकनेक्शन तोडण्यात आले आहेत. थकबाकीची रक्कम पालिकेत जमा करण्यासाठी थकबाकीदारांकडे आता ३१ मार्चपर्यंत म्हणजे चारच दिवस अवधी राहिला आहे.
कऱ्हाड शहरासह वाढील हद्दीतील थकबाकीदारांकडून पालिकेने लावलेल्या वसुलीच्या धडाक्यामुळे पालिकेने महिन्याभरात सहा कोटींचा अकडा पार केला आहे. फेब्रुवारी सुरुवातीपासून कमी स्वरूपात जमा होणाऱ्या रकमेत आता वाढ होत असल्याची पालिकेतील वसुली विभागातील कर्मचाऱ्यांकडून माहिती देण्यात आली आहे. थकबाकीदारांनी संकलित कराची रक्कम तत्काळ भरावी, यासाठी पालिकेने शहरात थकबाकीधारकांच्या नावाचे फलकही लावले. तसेच थकबाकीदारांच्या घरापुढे बँड पथक नेऊन वाजवू लागले आहेत. त्यामुळे आता पालिकेत नागरिकांकडून कराची रक्कम भरण्यासाठी गर्दी केली जात आहे.
शहरातील ६ हजार ११६ थकबाकीदारांपैकी निम्म्यांहून अधिक थकबाकीदारांनी संकलित कराची रक्कम पालिकेत भरली आहे. ज्यांनी अद्याप कराची रक्कम भरलेली नाही त्यांच्यावर पालिकेकडून सोमवारपासून कडक कारवाई केली जाणार आहे. संकलित कर न भरणाऱ्या दुकानगाळेधारकांना व घरगुती थकबाकीदारांवर जप्तीची करवाई केली जाणार असून, त्यासाठी प्रत्येक प्रभागात सात अधिकारी व कर्मचाऱ्यांची टीम तयार करण्यात आली आहे.
पालिकेच्या कर थकबाकीदारांमध्ये शासकीय कार्यालर्याचाही समावेश आहे. पाणीपट्टी, घरपट्टी, वीजकर, अग्निशामक, आरोग्यकर, सफाईकर अशा प्रकारच्या सात करांचा उपभोग घेणाऱ्या शासकीय कार्यालयातील नळकनेक्शन तोडून त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार आहे.
कोटींहून अधिक थकबाकीची रक्कम थकित ठेवणाऱ्या शासकीय कार्यालयांना त्याबाबत पालिकेकडून याबाबत नोटिसा देण्यात आलेल्या आहेत.
वर्षभर पालिकेच्या सुविधा उपभोगणाऱ्या नागरिकांकडून कर भरण्यास विलंब लावला जात असल्याने त्यांच्यावर कडक स्वरूपात कारवाई करण्याचा निर्णय मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी घेतला आहे. त्यासाठी सोमवारपासून प्रत्यक्ष जप्तीची व नळकनेक्शन तोडण्याची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे थकबाकीधारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)


कारवाईसाठी प्रभागनिहाय पथक
शहरात संकलित कराची रक्कम थकविणाऱ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्यासाठी १ विभागप्रमुख, १ क्लार्क, १ मुकादम, ४ शिपाई अशा सात जणांचे प्रत्येक प्रभाग निहायक पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाकडून शहरासह वाढीव जागेत असलेल्या थकबाकीदारांवर सोमवारपासून प्रत्यक्षरीत्या नळकनेक्शन तोडणे, जप्ती करणे अशा प्रकारची कारवाई केली जाणार आहे.


५५ घरगुती थकबाकीदार व गाळेधारकांवर जप्तीचे वॉरंट
कऱ्हाड पालिकेतील २०१४-१५ व २०१५-१६ या वर्षातील संकलित कराची रक्कम न भरणाऱ्या अशा ५५ घरगुती व गाळेधारक थकबाकीदारांवर पालिकेच्या वतीने जप्तीचे वॉरंट काढण्यात आले आहे. त्यांच्यावर सोमवारपासून प्रत्यक्षपणे कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेतील वसुली विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.


वसुलीसाठी लोकप्रतिनिधींकडून सहकार्य
शहरातील थकबाकीदारांनी संकलित कराची रक्कम भरून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आत्ता प्रत्येक लोकप्रतिनिधींकडून थकबाकीदारांना केले जात आहे. त्यामुळे पालिकेतील वसुली विभागातील कर्मचाऱ्यांना वसुली करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत नाही.

Web Title: Karhadi tax collection is twelve crore!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.