भक्तिसंगीताच्या आस्वादाने कऱ्हाडकर मंत्रमुग्ध
By admin | Published: January 28, 2015 09:05 PM2015-01-28T21:05:40+5:302015-01-29T00:14:07+5:30
अभंगाची उधळण : कऱ्हाडला प्रीतिसंगम महोत्सवाची उत्साहात सांगता
कऱ्हाड : येथील वेणूताई चव्हाण सभागृहात रौप्यमहोत्सवी संगीत महोत्सवाची दिमाखदारपणे मंगळवारी सांगता झाली ़ दिवंगत पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी व नातू विराज जोशी यांनी आपल्या सात्विक सुरांनी उपस्थित रसिक मनावर स्थान मिळवत कडाक्याच्या थंडीतही रसिकांना आपल्या अभंगातून भक्तिसंगीताची ऊब निर्माण करून दिली. या भक्तिसंगीताच्या आस्वादाने कऱ्हाडकर मंत्रमुग्ध झाले.कऱ्हाड जिमखान्याने प्रीतिसंगम संगीत महोत्सवाचे आयोजन केले होते. त्याची दिमाखदार सांगता मंगळवारी पंडित श्रीनिवास जोशी व नातू चिरंजीव विराज जोशी यांच्या अभंगवाणीने झाली.यावेळी जिमखान्याचे अध्यक्ष सुधीर एकांडे, सचिव डॉ़ मिलिंद पेंढारकर, चंद्रशेखर देशपांडे, अनिल शहा, विवेक ढापरे, चंद्रकांत जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती़ पंडित श्रीनिवास जोशी यांनी ‘बिहाग’ रागाच्या तारा छेडत अभंगाला प्रारंभ केला़ ‘कैसे सुख सोरे नींद हा बडा ख्याल’ तसेच ‘लट उलझी, सुलझा बालम,’ ‘हाथो मे मेहंदी, खेलो नंदलाल संग आज होली ’ या गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले़ त्यांनंतर पंडितजींनी आपला प्रसिध्द अभंग ‘कान्होबा तुझी घोंगडी चांगली’ सादर करून रसिकांची दाद मिळविली. यानंतर दिवंगत पंडितजींचा नातू चिरंजीव विराज जोशी यांनी आपल्या गोड व सुरेल आवाजात नामाचा गजर गर्जे भीमातीर, रामाचे भजन हेची माझे ज्ञान, माझा भाव तुझे चरणी, विमुख शिखर या संत रचनांबरोबर पंडितजींचे गाजलेले भजन ‘बाजे मुरलिया बाजे’ सादर करून मांगल्याच्या मंचावर भक्तिरसाची उधळण केली. श्रीनिवास जोशी यांच्या पु. ल. यांनी संगीतसाज चढवलेल्या ‘माझे माहेर पंढरी’ या अभंगाने भक्तिरसाने चिंब होणे म्हणजे काय या प्रश्नाचे जणू उत्तरच दिले. ‘आजा सावरीयाँ तोसे गरवा लगाओ’ या भैरवी रागातील ठुकरीने कार्यक्रमाची सांगता झाली.
मैफलीस तबलासाथ अविनाश पाटील तर संवादिनीची साथ पंडित रवींद्र कातोटी यांनी केली. सांगलीच्या नारायण जोशींच्या पखवाज साथीने कार्यक्रमात रंगत आणली. स्थानिक कलाकार दिलीप आगाशे यांनी टाळावर तर निखिल कुलकर्णी व मधुरा किरपेकर यांनी तानपुऱ्यावर साथ केली. महोत्सवात उपस्थित कलाकारांची ओळख विवेक ढापरे यांनी करून दिली. शिरीष संभूस यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)