एकात्मता दौडमध्ये कऱ्हाडकर धावले
By Admin | Published: December 15, 2015 09:35 PM2015-12-15T21:35:01+5:302015-12-15T23:25:29+5:30
विजय दिवस : शंभरजणांचे रक्तदान; आज मुख्य सोहळा; मान्यवरांची उपस्थिती
कऱ्हाड : भारतीय सैन्यदलाच्या बांगला मुक्ती संग्रामातील देदीप्यमान विजयाप्रीत्यर्थ कऱ्हाडला साजरा होत आहे. या विजय दिवस समारोहाच्या दुसऱ्या दिवशी दि. १५ रोजी विजय दिवस समारोह समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कऱ्हाडदौडमध्ये मंगळवारी कऱ्हाडकर धावले. तर शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी यावेळी रक्तदान केले. यावेळी सलीम मुजावर यांच्या हस्ते झेंडा दाखवून दत्तचौक येथून कऱ्हाड दौडला सुरुवात झाली. यावेळी पोलीस बॅन्डने मानवंदना दिली. कर्नल संभाजीराव पाटील, शंकराप्पा संसुद्दी, अॅड. संभाजीराव मोहिते, टी. डी. कुंभार, महालिंग मुंढेकर, विनायक विभूते, प्रा. शंकरराव डांगे, रत्नाकर शानबाग आदी मान्यवर उपस्थित होते.दत्तचौक येथून सुरू झालेली कऱ्हाड दौड ही कृष्णानाका, कन्या महाविद्यालय, आझाद चौक, चावडीचौक ते दत्तचौक या मार्गे काढण्यात आली. यावेळी संगमहेल्थ क्लबच्या खेळाडूंसह विविध शाळांचे विद्यार्थी, मिलीटरी बॉईज होस्टेलचे विद्यार्थी यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.यानंतर लिबर्टी मजदूर मंडळ येथील हॉलमध्ये रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी मुख्याधिकारी प्रशांत रोडे, नगरसेविका अरुणा जाधव, मलकापूर उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कर्नल संभाजीराव पाटील, शंकराप्पा संसुद्दी, अॅड. संभाजीराव मोहिते, टी. डी. कुंभार, रत्नाकर शानबाग, विनायक विभूते आदींनी उपस्थिती लावली. शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. (प्रतिनिधी)