कऱ्हाडकर तेरी कृष्णा मैली!

By admin | Published: February 3, 2015 09:37 PM2015-02-03T21:37:12+5:302015-02-03T23:57:00+5:30

‘टेंभू’मुळं अडलं दूषित पाणी : कऱ्हाड शहरासह अनेक गावांना फटका, दीड लाख नागरिकांच्या आरोग्याला धोका

Karhadkar is your Krishna dirty! | कऱ्हाडकर तेरी कृष्णा मैली!

कऱ्हाडकर तेरी कृष्णा मैली!

Next

कऱ्हाड : ‘संथ वाहते कृष्णामाई,’ हे बोल साऱ्यांच्याच तोंडावर आहेत; पण कऱ्हाडात मात्र ‘दूषित वाहते कृष्णामाई, तिरावरच्या नागरिकांची स्थिती तिला माहित नाही,’ अशीच विचित्र परिस्थिती आज निर्माण झाली आहे. टेंभूत अडविलेल्या पाण्यामुळे अवघी कृष्णामाई दूषित झाली असून परिसरातील काठावरची सुमारे सतरा गावे आज साथीच्याउंबरठ्यावर आहेत. अंदाजे दीड लाख नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. कऱ्हाडमध्ये कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम झालाय आणि प्रीतीसंगमापासून ही नदी पुढे टेंभूतून सांगली जिल्ह्यात जाते. दुष्काळी कडेगाव, खानापूर, पलूस तालुक्यांना पाणी मिळावे, म्हणून टेंभू उपसा जलसिंचन योजना साकारण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक्यातील माळावर ‘मळे’ फुलले आहेत खरे, मात्र या दूषित पाण्यामुळे कऱ्हाड तालुक्यात नदीकाठावरील लोकांच्या ‘गळ्या’तून हे दुषित पाणी उतरेनासे झाले आहे. या उपसा जलसिंचन योजनेसाठी कोट्यावधी रूपये खर्च करून टेंभू येथे योजना उभारण्यात आली. आगरकरांचे टेंभू म्हणून ओळख असणाऱ्या टेंभू गावाची या योजनेमुळे आणखी एक ओळख निर्माण झाली. प्रकल्पस्थळी आणखी एक वीजनिर्मिती केंद्रही उभे करण्यात आले आहे. त्यासाठी हे पाणी अडविले जात असून त्याचा दुष्परिणाम कऱ्हाडसह परिसरातील अनेक गावांना सोसावा लागत आहे. कृष्णा नदीपात्रात कऱ्हाड व मलकापूर शहरातील ड्रेनेजचे पाणी मोठ्या प्रमाणात दररोज सोडले जाते. त्याचबरोबर सैदापूर, विद्यानगर, गोवारे आदी गावातील सांडपाणीही याच नदीत सोडले जात असल्याने साचलेल्या या पाण्याला दुर्गंधी येऊ लागली आहे. पाण्याला पिवळसर रंग आला आहे. शहरामधून हे पाणी शुद्ध करून नागरिकांना पुरविण्याचा प्रयत्न केला जात असला तरी त्यामध्ये यश येत नसल्याचे दिसते. त्यामुळे अनेक साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत वेळोवेळी उठाव केला जात असला तरी त्याची दखल फारशी घेतली जात नसल्याचे दिसते. सोमवारी मनसे आक्रमक झाल्यानंतर टेंभूचे अधिकारी काहीसे जागे झाले आणि टेंभू प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने पालिकेच्या पत्राची दखल घेत पाणी सोडायला सुरूवात केली आहे. मात्र, तेथून होणारा पाण्याचा विसर्ग आणि दररोज नदीपात्रात मिसळणारे दुषित पाणी याचा विचार केला तरी टेंभूचे अधिकारी आंदोलकांच्या तोंडाला पाने पुसत असल्याचे निदर्शनास येते. नेहमीप्रमाणे या अधिकाऱ्यांनी लवकरच प्रशासकीय अधिकारी व आंदोलकांची बैठक घडविण्याचे आश्वासन दिले आहे खरे; पण अधिकारी शब्द पाळणार का, बैठक झालीच तर त्यातून योग्य मार्ग निघणार का अन् कऱ्हाडकरांना शुद्ध पाणी मिळणार का, याचे उत्तर सध्या तरी देणे कठीण आहे. (लोकमत टीम)

या गावांना बसतोय फटका...
संथ वाहणारी कृष्णामाई या टेंभू प्रकल्पात अडविल्याने दूषित होत आहे. टेंभूत पाणी अडविल्याने टेंभूसह गोवारे, सयापूर, कोरेगाव, हजारमाची, राजमाची, ओगलेवाडी, गजानन हौंसिंग सोसायटी, बनवडी, विद्यानगर, सैदापूर आणि कऱ्हाड या गावांना फटका बसतोय. येथील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आता गंभीर बनला आहे.

टेंभुकर निश्चित
टेंभू योजनेमुळे कृष्णा नदीचा प्रवाह अडविला जातोय. पाणी दुषित होऊन त्याचा पिण्याच्या पाण्यावर परिणाम होत आहे. याचा फटका टेंभुकरांनाही बसत होता. मात्र, दोन वर्षापुर्वी टेंभू ग्रामस्थांनी नदीकडेला विहीर असतानाही नळपाणी पुरवठ्याची आणखी एक विहीर काढली आहे. सध्या त्यांना तेथुन शुद्ध पाणी पुरवठाही होत आहे. त्यामुळे ते निश्चित आहेत.

टेंभुतून पाणी सोडले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन छेडल्यानंतर टेंभुच्या अधिकाऱ्यांना जाग आली असुन त्यांनी त्वरीत तेथुन पाणी सोडण्याबाबत हालचाली सुरू केल्या. रात्री उशिरानंतर प्रकल्पाचा एक दरवाजा दोन फुटाने उचलून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे निर्माण झालेली दुषित पाण्याची परीस्थिती कमी होण्यास मदत होईल, असे सांिगतले जात आहे.
मलकापूरला दिलासा
नदीकाठच्या सर्वच गावांना नदीपात्रानजीक विहीर काढून तेथुन पाणी पुरवठा योजनेद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जाते. मात्र, नदीचे पाणी दुषित झाल्याने त्याचा विपरीत परीणाम आरोग्यावर होत आहे. मलकापुरलाही या नदीपात्रातूनच पाणी पुरवठा होतो; पण त्यांच्या चोवीस तास पाणी योजनेमुळे मलकापुरातील नागरिकांना सध्यातरी दिलासा मिळत आहे.

पोहणाऱ्यांना त्वचेचे विकार
पोहणे हा सर्वात चांगला व्यायाम आहे. येथील प्रीतीसंगमावर तर कृष्णेच्या पात्रात दररोज शेकडो नागरीक सकाळी पोहण्यासाठी येतात. नदीच्या एका त्ीारावरून पैलतीरावर जातात. यातून त्यांचा व्यायाम होतोय खरा; पण टेंभुमध्ये कृष्णेचे पाणी अडविल्याने पाणी दूषित झाले असून व्यायामाने आरोग्य उत्तम होण्याऐवजी दूषित पाण्यामुळे त्वचेचे आजार मात्र वाटणीला येत आहेत.

टेंभुच्या योजनेमुळे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होत आहे. तेच पाणी प्यावे लागत असल्याने लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे.
- महादेव भोसले,
शेतकरी, गोवारे
टेंभू प्रकल्पासाठी पाणी अडविणे क्रमप्राप्तच आहे; पण जेवढा वेळ आवश्यक आहे तेवढा वेळच ते अडविले गेले पाहिजे. ते किती प्रमाणात साठवायचं हे ठरवलं पाहिजे. याबाबत तज्ञांशी चर्चा करून निर्णय घेणार आहोत. सांडपाण्याबाबत संबंधितांशी चर्चा करून कायमस्वरूपी उपाय काढण्यासाठी प्रयत्नशिल राहणार आहे. सकारात्मक निर्णय न झाल्यास जनआंदोलन उभारणार आहोत.
- अ‍ॅड. विकास पवार,
जिल्हाध्यक्ष, मनसे
आम्ही गजानन हौसिंग सोसायटीत राहतो. आमची ग्रामपंचायत गोवारे आहे. आम्हाला कऱ्हाड नगरपालिकेकडून पाणी पुरवठा व्हावा, म्हणून खूप प्रयत्न केले. आता ते मिळाले आहे; पण टेंभूच्या योजनेमुळे कृष्णेचे पाणी दुषित असून ते पिण्याची वेळ आमच्यावर आली आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची गरज आहे.
- सचिन काटवटे,
उपसरपंच, गोवारे
आमच्या गावात पिण्याच्या पाण्याची योजना कुपनलिकेवरून आहे. त्यामुळे पिण्याच्या दुक्षित पाण्याचा प्रश्न नाही; पण नदीचे पाणी दूषित असल्याने दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. नदीचे पाणी प्रवाहित रहावे, यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत.
- प्रशांत भुसारी,
ग्रामस्थ, सयापूर

Web Title: Karhadkar is your Krishna dirty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.