कर माफी मागणीसाठी कऱ्हाडला उद्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:29 AM2021-07-17T04:29:15+5:302021-07-17T04:29:15+5:30
कऱ्हाड : शहरातील सर्वांचीच सरसकट पाणी व घरपट्टी माफ करावी, अशी मागणी येथील सुधारक सामाजिक विकास संस्थेतर्फे मुख्याधिकारी रमाकांत ...
कऱ्हाड : शहरातील सर्वांचीच सरसकट पाणी व घरपट्टी माफ करावी, अशी मागणी येथील सुधारक सामाजिक विकास संस्थेतर्फे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक घर आणि दुकानावर रविवारी, दि. १८ नागरिकांनी काळे झेंडे लावून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन संस्थेने केले आहे. मुख्याधिकारी रमाकांत डाके, तहसीलदार अमरदीप वाकडे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. शहरातील हॉकर्स संघटना, किराणा भुसार व्यापारी असोसिएशन, स्टेशनरी दुकान असोसिएशन, कापड व्यापारी संघटना, मंडप असोसिएशन, सराफ व्यापारी संघटना, हॉटेल असोसिएशन यांनी पाठिंबा दिला आहे.
कऱ्हाडात नाल्यांच्या सफाईला वेग
कऱ्हाड : गत महिन्यात मुसळधार पावसामुळे शहरातील कोल्हापूर नाका परिसरातील काही दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. त्यानंतर पालिका प्रशासनाने कऱ्हाड हॉस्पिटल परिसरात चार फुटी नवीन पाईपलाईन टाकली आहे. तसेच या परिसरातील लाहोटी प्लाझा परिसरात नालेसफाईचे काम हाती घेतले आहे. त्याचबरोबर पाणी साचणाऱ्या शहरातील अन्य विभागात नालेसफाईचे काम वेगाने सुरू आहे. आरोग्य सभापती विजय वाटेगावकर हे स्वत:च्या कामावर लक्ष ठेवून आहेत.
अत्याधुनिक यंत्रणेद्वारे कृष्णा फुलाची तपासणी
कऱ्हाड : कार्वे, ता. कऱ्हाड येथील कृष्णा पुलाची तपासणी अत्याधुनिक पालफिंगर यंत्रणेद्वारे सुरू आहे. कऱ्हाड ते तासगाव मार्गावरील कृष्णा नदीवर पूल तपासणी युनिटने तपासणी केली जात आहे. चार दिवसांपूर्वी खासदार श्रीनिवास पाटील यांनी कार्वे येथील नवीन पुलाचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे. पुलाची वजन क्षमता, मजबुती आदीची तपासणी करण्यात येत आहे. तासगाव मार्गावरील रस्ते व पूल वेगवेगळ्या विभागांकडे असून संबंधित विभागाकडून त्याची वारंवार तपासणी केली जाते.