कऱ्हाडला नगरपरिषदेच्या ठरावाचे नगराध्यक्षांकडून अवमूल्यन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:49 AM2021-07-07T04:49:31+5:302021-07-07T04:49:31+5:30
कऱ्हाड : कृष्णा कारखान्यात विजयी सहकार पॅनेलच्या अभिनंदनाचे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व त्यांचे पती उमेश शिंदे यांनी कऱ्हाडातील ...
कऱ्हाड : कृष्णा कारखान्यात विजयी सहकार पॅनेलच्या अभिनंदनाचे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व त्यांचे पती उमेश शिंदे यांनी कऱ्हाडातील शनिवार पेठेत लावलेल्या फ्लेक्सला कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्याचे लेखी उत्तर मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिले आहे. तक्रार दाखल होताच ते फ्लेक्स कऱ्हाडातून गायब झाले आहेत. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांंच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेच्या मासिक बैठकीत केलेल्या ठरावाचे कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनीच अवमूल्यन केले आहे. त्यामुळे नगराध्यक्षांसह त्यांच्या पतीवर सार्वजनिक मालमतेतेचे नुकसान, नगरपरिषेदच्या ठरावाचे अवमूल्यन केल्याबद्दल कऱ्हाड नगरपरिषेदने फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्मिता हुलवान यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व त्यांचे पती उमेश शिंदे यांनी विना परवानगी फ्लेक्स लावले आहेत. ते लावताना त्यांनी कऱ्हाडच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे. त्याबरोबर वाहतुकीला अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे नगरपरिषदेने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, यासाठी आम्ही आग्रही आहोत.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना हुलवान यांनी लेखी मागणी केली होती. त्यांनी केलेल्या मागणीनुसार मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी फ्लेक्स लावण्यासाठी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व त्यांचे पती उमेश शिंदे यांनी कोणतीही परवानगी घेतलेली नाही, अगर फ्लेक्स लावण्यासाठी परवानगीचा अर्ज केलेला नाही, असे उत्तर दिले आहे. हुलवान यांनी दिलेल्या निवेदनात कृष्णा कारखान्यात सहकार पॅनेल विजयी झाले. त्यांच्या अभिनंदनाचे कऱ्हाडात एक जुलै रोजी फ्लेक्स लावले आहेत. शुभेच्छा बोर्ड नगराध्यक्षा रोहिणी उमेश शिंदे व त्यांचे पती उमेश आनंदराव शिंदे यांनी शनिवार पेठ, शाहू चौक व शनिवार पेठ बनपुरीकर कॉलनी परिसरात लावले आहेत. या बोर्डसाठी कऱ्हाड नगरपरिषेदची कोणतीही परवानगी घेतली आहे का, याची मागणी निवेदनाने केली होती. त्याला अशी कोणतीही परवानगी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व त्यांचे पती उमेश शिंदे यांनी घेतली नाही, असे उत्तर मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिले आहे. त्यामुळे त्या दोघांवर कायदेशीर करावाईसाठी आम्ही आग्रही आहोत, असे हुलवाना यांनी म्हटले आहे.