कऱ्हाडला भाजीसोबत रोगराई ‘फ्री’

By admin | Published: February 23, 2015 09:15 PM2015-02-23T21:15:58+5:302015-02-25T00:15:34+5:30

मंडईत आजारांचा बाजार : पालिकेची करवसुली नियमित; पण सुविधा मात्र नाही, कचराकुंडी असूनही मार्केटमध्ये दुर्गंधीचे साम्राज्य--आॅन दि स्पॉट रिपोर्ट

Karhad's disease with vegetable 'free' | कऱ्हाडला भाजीसोबत रोगराई ‘फ्री’

कऱ्हाडला भाजीसोबत रोगराई ‘फ्री’

Next

संतोष गुरव - कऱ्हाड  : येथील पालिकेच्या शिवाजी भाजी मंडईत कित्येक दिवसांपासून सुविधांची वानवा जाणवत आहे. मंडई परिसरात दररोज भरणाऱ्या बाजारामधून भाजीबरोबरच आजारही फुकटात मिळत असल्याची परिस्थिती आहे. दुर्गंधी व घाणीमुळे येथून साथीरोग पसरण्याची भीती आहे. रस्त्यांची अस्वच्छता, ओसांडून वाहणाऱ्या कचराकुंड्या, दुर्गंधीयुक्त पदार्थ व त्याच्याशेजारीच बसून होणारी भाजी विक्री असा धक्कादायक प्रकार सध्या मंडईत पाहावयास मिळतोय.
शहरतील मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयी-सुविधांनियुक्त अशी शिवाजी भाजी मंडई आहे. पालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या नवीन भाजी मंडई इमारतीमध्ये व परिसरातही नियमित स्वच्छता ठेवण्यात येईल, अशी आश्वासने पालिकेतर्फे मंडई परिसरातील नागरिकांना देण्यात आली होती. मात्र, सध्या त्या आश्वासनांचा पालिकेला विसर पडलाय.
नवीन भाजी मंडई परिसरात बसण्यासाठी शहरातील किरकोळ भाजी विके्रत्यांसह टेंभू, ओगलेवाडी, आगाशिवनगर, कार्वे, विंग, घारेवाडी आदी गावांतून शेतकरी येतात. आपली ताजी भाजी पाटीमध्ये भरून भल्या पहाटे मंडईत जाणाऱ्या या शेतकऱ्यांना मंडईमध्ये बसण्यास स्थानिक व्यापाऱ्यांकडून विरोध केला जातो. त्यामुळे मंडईबाहेर बसून या शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री करावी लागते. यामध्ये महिला शेतकऱ्यांचाही समावेश असतो.
इमारती बाहेर बसल्यामुळे या भाजी विक्रेत्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. रस्त्यांची अस्वच्छता, मंडईमध्येच महावितरणच्या फ्यूजबॉक्सशेजारी असणारी कचराकुंडी, त्यातून येणारा दुर्गंधीयुक्त वास, उघड्यावर टाकलेल्या मांसावर घोंगावणाऱ्या माशा अशा समस्यांना शेतकरी विक्रेते दररोज तोंड देतात.
पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांकडून सकाळी सात वाजताच दिवसातून एकदा स्वच्छता केली जात असल्यामुळे दिवसभर पडणाऱ्या कचऱ्यामध्येच भाजी विक्रेत्यांना बसावे लागते. या कचऱ्यामुळे भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकालाही घाण वाटत असल्याने त्यांच्याकडून भाजी खरेदी केली जात नाही. अशा दुर्गंधीयुक्त वातावरणामध्ये सकाळपासून सायंकाळपर्यंत शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री करण्यासाठी बसावे लागत आहे.
भाजी मंडईत स्वच्छता करण्याची मागणी व्यापारी व भाजी विक्रेत्यांकडून केली जात असूनही पालिकेचे कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. भाजी मंडईमध्ये साचत असलेल्या कचऱ्यापासून अनेक आजारांचा फैलाव होत आहे. ताजा माल असूनही भाज्यांवर बसणाऱ्या माश्यांमुळे व जवळच्या कचऱ्यामुळे आजार होण्याच्या भीतीने नागरिकांकडून भाजी खरेदी केला जात नाही. त्याचा तोटा शेतकरी विक्रेत्यांना सहन करावा लागत आहे.
मंडईत दररोज स्वच्छता केली जात असल्याचे पालिकेकडून सांगितले जाते. तर मग पालिकेच्या मंडई इमारतीमध्येच कचऱ्याचे ढीग अन् सुविधांची वानवा कशी, असा प्रश्न उपस्थित होतो. लाखो रुपये खर्च करून पालिकेने शहरातील व्यापाऱ्यांसाठी मंडई उभारून देखील त्याची नियमित देखभाल केली जात नसल्याचे दिसते.


नियोजित जागेवर अजूनही काम अपूर्ण
नवीन भाजी मंडई इमारतीच्या बाजूला असणाऱ्या मोठ्या जागेवर पलिकेकडून विविध कामे करण्यात येणार आहेत. त्याबाबतची माहिती वर्षापूर्वी पालिकेकडून मंडई परिसरातील व्यापारी व नागरिकांना देण्यात आली होती. मात्र, त्या जागेवर आजही फक्त मोठमोठे दगड आहेत.


पावतीवर
पाच रुपये मात्र ...
कऱ्हाड पालिकेतर्फे भाजी मंडई परिसरात बसणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांकडून जागा भाडे म्हणून दहा रुपये घेतले जातात. मात्र, प्रत्यक्षात पाच रुपयांची पावती दिली जाते. याशिवाय पावतीवर तारीख व वसुली क्लार्कची सहीसुद्धा नसते, असा आरोप विक्रेत्यांकडून केला जात आहे.

पावसाळ्यात होते तारांबळ

नवीन भाजी मंडईत विक्रेत्यांना बसण्यासाठी उंच कठडे बांधण्यात आले आहेत. मात्र, तरीही मंडई बाहेरील भाजी विक्रेत्यांना उभे राहूनच भाजी विकावी लागत आहे. पाण्याच्या वाहत्या लोंढ्यामध्ये एका बाकड्यावर भाजी ठेवून भाजी विकताना व्यापाऱ्यांची चांगली तारांबळ उडते.

शेतकऱ्यांच्या मागण्या
मंडई परिसरात कचराकुंडी वाढवावी
नियमित स्वच्छता ठेवावी
चोवीस तास पाणी सुविधा
स्वच्छतागृहात स्वच्छता असावी
निवाऱ्यासाठी शेड उभारावे
कराप्रमाणे सुविधा द्याव्यात
पावसाळ्यात मंडईत जागा द्यावी
मंडई परिसरातील अपूर्ण काम पूर्ण करावे
इमारतीमध्ये बसण्यासाठी जागा द्यावी
स्थानिक व्यापाऱ्यांनी सहकार्य व्हावे


विक्रेत्यांच्या समस्या
मद्यपींमुळे नाहक त्रास
कचराकुंडी भरल्याने दुर्गंधीचा त्रास
पावसाळ्यात दुर्गंधीयुक्त पाणी
अस्वच्छ स्वच्छतागृह
मच्छी मार्केटमुळे दुर्गंधी
कचऱ्यामुळे कुत्री, जनावरांचा वावर
घाणीमुळे मच्छर, माश्यांचे जास्त प्रमाण
कमी जागेमुळे मालविक्रीवर बंधने
मंडई परिसरातील अपुऱ्या कामामुळे होणारे वाद
स्थानिक विक्रेत्यांकडून होणारा त्रास


मंडईबाहेर बसल्यावर कचऱ्याचा खूप त्रास होतो. मात्र, मालही उघड्यावर टाकून जाता येत नाही. त्यामुळे तिथेच उघड्यावर बसून जेवण करावे लागते. घाण वाटते; काहीच करता येत नाही.
- ममताज पसतवी,
भाजी विक्रेत्या


पालिकेच्या नवीन मंडई इमारतीत कट्टा असूनही धंदा होत नसल्याने बाहेर बसावं लागतं. बाहेर उन्हाचा तसेच पावसाळ्यात पाण्याचा त्रास होतो. तरीही बाहेर बसूनच धंदा करावा लागतो.
- हसीन अंबेकरी,
भाजी विक्रेत्या


इमारतीत व्यवसाय होत नाही
पालिकेच्या नवीन मंडई इमारतीमध्ये लोक येत नाहीत. तसेच होलसेल भावाने मालाची विक्री काही विक्रेत्यांकडून केली जात असल्याने दिवसाला दहा किलोही माल इमारतीमध्ये बसल्यावर विकला जात नाही. त्यामुळे बाहेर बसावे लागते, अशी प्रतिक्रिया टेंभूतील एका शेतकरी विक्रेत्याने दिली. मात्र, संबंधित विक्रेत्याने आपले नाव सांगण्यास नकार दिला.

Web Title: Karhad's disease with vegetable 'free'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.