‘एमटीएस’ परीक्षेत कऱ्हाडचा झेंडा
By admin | Published: March 25, 2015 10:38 PM2015-03-25T22:38:43+5:302015-03-26T00:08:08+5:30
पालिका शाळा क्र. तीन : गुणवत्ता यादीत आठ विद्यार्थी, ‘आयएसओ’ मानांकनासाठी प्रस्ताव
कऱ्हाड : महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेच्या इयत्ता दुसरी व तिसरीच्या गुणवत्ता यादीत कऱ्हाड पालिकेच्या शाळा क्रमांक तीनचे आठ विद्यार्थी चमकले आहेत. या शाळेने सलग तिसऱ्या वर्षी गुणवत्ता यादीत येण्याची परंपरा जपली असून, शाळेतर्फे ‘आयएसओ’ मानांकनासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी शेखर पाटील यांनी दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन कोळी उपस्थित होते. प्रशासकीय अधिकारी पाटील म्हणाले, ‘टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये इयत्ता दुसरीमधील मृण्मयी लोंढे ही जिल्ह्यात गुणवत्ता यादीत दुसरी, आदित्य गुरव तिसरा, अनुजा लोकरे चौथी, तनिष्का मुंढेकर सातवी आली आहे. इयत्ता तिसरीमधिल ऋतुजा गोतपागर हिने दहावा, मृणाल माळी याने अकरावा, सार्थक कदम याने बारावा व अनुजा हुलवान हिने चौदावा क्रमांक पटकाविला.’पालिका शाळा क्रमांक तीन ही गुणवत्तेत पश्चिम महाराष्ट्रात अग्रेसर शाळा आहे. तीन वर्षांत या शाळेचे तीस विद्यार्थी शिष्यवृत्ती व एम. टी. एस. परीक्षेच्या राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत आले आहेत. पहिलीपासून सेमी इंग्रजी, स्पर्धा परीक्षेचे स्वतंत्र वर्ग, १६ स्कूल बस अशा सुविधा या शाळेत निर्माण करण्यात आल्या आहेत. या शाळेत परिसरातील वीस गावांमधून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात, हे शाळेचे वैशिष्ठ्य आहे. शिवाय माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना या शाळेने मिळवलेल्या गुणवत्तेबद्दल गौरवोद्गारही काढले असल्याचे पाटील यांनी सांगितले. मुख्याध्यापक अर्जुन कोळी म्हणाले, ’१९७६ सालापासून ते २०१५ पर्यंत पालिकेच्या कोणत्याही शाळेला यश मिळवता आले नव्हते. ती परंपरा शाळा क्रमांक तीन ने आता मोडित काढली आहे. विद्यार्थ्यांना संगणक प्रणालीच्या माध्यमातून आधुनिक ज्ञान मिळावे, यासाठी शाळेत डिजिटल क्लासरूम उभारण्याचे काम सुरू आहे. यासाठी चार लाख रूपये खर्च अपेक्षित असून, समाजातील दानशूर लोकांनी मदत करावी.’विद्यार्थ्यांना शिक्षिका उर्मिला माने, मधुमालती भगत व रोहिणी देसाई यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)