कऱ्हाडची बाजारपेठ गर्दीने फुलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:38 AM2021-04-15T04:38:15+5:302021-04-15T04:38:15+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून पंधरा दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या कालावधीत किराणा माल, ...

Karhad's market was crowded | कऱ्हाडची बाजारपेठ गर्दीने फुलली

कऱ्हाडची बाजारपेठ गर्दीने फुलली

Next

कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून पंधरा दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या कालावधीत किराणा माल, भाजीपाला, तसेच फळ विक्री सुरू राहणार असली तरी सर्वच बेभरवशी असल्यामुळे साहित्य खरेदी करण्यासाठी बुधवारी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे दिसून आले. मुळातच गत शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे सोमवारी बाजारपेठ सुरू होताच नागरिकांनी सलग तीन दिवस खरेदीसाठी धावपळ केली. मिळेल त्या दुकानात नागरिक पोहोचल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात एकच झुंबड उडाल्याचे चित्र गत तीन दिवसांपासून पाहायला मिळत आहे.

पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेडस् लावल्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. या गर्दीतून वाट काढीत अनेक जण किराणा दुकानांकडे धाव घेत होते. गर्दीला आवरताना पोलिसांचीही दमछाक झाली. ध्वनिक्षेपकाद्वारे पोलिसांकडून वारंवार सूचना देण्यात येत होत्या. मात्र, तरीही बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणात येत नव्हती. रात्री आठ वाजेपर्यंत बाजारपेठेतील रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ दिसून येत होती.

- चौकट

अनेक दुकानांमध्ये वादावादी

शनिवार व रविवार दोन दिवस संपूर्ण बाजारपेठ बंद होती. आता कडक लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारी नागरिक तातडीने साहित्य घेण्यासाठी घराबाहेर पडले. परिणामी दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी झाली. या गर्दीवर नियंत्रण ठेवताना दुकान मालकांची ग्राहकांशी वादावादी झाल्याचेही पाहायला मिळाले.

फोटो : १४केआरडी०३

कॅप्शन : कऱ्हाडच्या बाजारपेठेत बुधवारी किराणासह इतर साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

Web Title: Karhad's market was crowded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.