कऱ्हाडचे राजकारण तासवडेच्या टोलनाक्यावर !
By admin | Published: August 26, 2016 12:36 AM2016-08-26T00:36:00+5:302016-08-26T01:13:11+5:30
ठेका बदलाचं वारं वाहतंय उलटसुलट : ‘लेबर कॉन्ट्रॅक्ट’ अजूनही ‘सिंहा’कडे; पण नाक्यावर पाटील‘की’ मंगळवारातली?
प्रमोद सुकरे- कऱ्हाड --पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे येथे वाहनांसाठीचा टोलनाका उभारण्यात आला आहे. शासनाकडून त्याच्या टोल वसुलीचा ठेका खासगी कंपनीला दिला जातो. कंपनी कोणतीही असो; पण येथील कर्मचाऱ्यांचा ठेका मात्र गेली सहा वर्षे कऱ्हाडचा एक ‘सिंह’च सांभाळत आहे. नुकतीच जुन्या कंपनीची मुदत संपून हा मूळचा ठेका ‘सहकार ग्लोबल’ कंपनीने मिळविला आहे. मात्र या ठेका अदलाबदलीचे वारे कऱ्हाडात उलट-सुलट वाहू लागल्याने शहराचे राजकारण तासवडेच्या टोल नाक्यावरच पोहोचल्याची चर्चा आहे.
महामार्गावरील टोलनाके ठेकेदारांसाठी सुवर्णसंधीच मानली जाते. मग तो संपूर्ण ठेका असो वा फक्त कामगारांचा. साताऱ्याच्या थोरल्या राजेंचं छत्र लाभलेल्या कऱ्हाडच्या एका ‘सिंहा’ला गेल्या सहा वर्षांपासून या टोल नाक्याच्या कामगारांचा ठेका मिळाला आणि त्यांच्या आर्थिकसोबत राजकीय दबदबाही वाढला. तरुणांचं चांगलं नेटवर्क उभं राहिल्यानं शहराबरोबर तालुक्यातही त्याचे वारे वाहू लागले. टोलच्या ‘लेबर कॉन्ट्रॅक्ट’च्या माध्यमातून त्यांनी आपला राजकीय मार्गही सुकर क रून घेतला नसेल तर नवलच.
तासवडे टोलनाका आणि कऱ्हाडचा ‘सिंह’ असे जणू समीकरणच झाले असताना महिन्याभरापूर्वी मूळच्या जुन्या कंपनीच्या ठेक्याची मुदत संपली. शासनाने नव्याने निविदा मागविल्या; मात्र, यात ‘सहकार ग्लोबल’ कंपनीने बाजी मारली. कंपनी कोणतीही असली तरी कामगार ठेक्याला अडचण कसली? अशी या ‘सिंहा’ची भूमिका; पण कोणत्याही पीचवर खेळी करण्यात पटाईत असणाऱ्या कऱ्हाडातील ‘पाटील’ टीमचे खेळाडू या मैदानात उतरले. नव्या कंपनीतच भागीदारी मिळविलेल्या या खेळाडूंनी अगोदरच अर्धे ‘रण’ ‘जीत’ले होते.
कंपनी बदलली, आता कामगार ठेकाही बदलणार या चर्चेनंतर कामावरील अस्वस्थ तरुणांनी आपल्या ‘सिंह’रूपी राजाकडे धाव घेतली. त्यांच्यात गेले महिनाभरात कऱ्हाडात वारंवार ‘संगम’ झाला; पण ‘युद्धाबरोबर तहातही जिंकणं’ ज्यांना जमतं ते ‘विजय’ मिळवितात, हे माहीत असलेल्या भावांनी ‘लांब उडी मारायची असेल तर दोन पावले मागे घेतली’ अन् नव्या कंपनीतील नव्या भागीदारांसोबतच चर्चा करीत या चर्चांना विराम देण्याचा प्रयत्न केलाय; पण विषय येथेच संपलाय का? हे कळण्यासाठी अजून काही महिने वाट पाहावी लागणार, हे निश्चित.
काका, दादा, बापूही हजर !
टोलनाक्यावरचा ठेका बदलल्यानंतर नव्या कंपनीने ‘सेलिब्रेशन’ केले. फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी करीत त्यांनी श्रीफळ वाढविले. त्यावेळी मंगळवारातील ‘काका’, ‘दादा’, ‘भाऊ’, ‘बापू’सारे झाडून हजर होते. महामार्गावरील तासवडे टोल नाक्यावर गेली अनेक वर्षे राज्य करणाऱ्या ‘सिंह’ रूपी ‘राजा’ला हे किती पचनी पडलंय, हा संशोधनाचा विषय आहे.