कऱ्हाडचे विज्ञान केंद्र संकटात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:47 AM2021-07-07T04:47:51+5:302021-07-07T04:47:51+5:30
कऱ्हाड : चिमुकल्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाला बळकटी देत हसत-खेळत विज्ञानाचे धडे देणारे कऱ्हाडातील कल्पना चावला विज्ञान केंद्र संकटात सापडले आहे. ...
कऱ्हाड : चिमुकल्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाला बळकटी देत हसत-खेळत विज्ञानाचे धडे देणारे कऱ्हाडातील कल्पना चावला विज्ञान केंद्र संकटात सापडले आहे. पंधरा वर्षांपासून ‘विज्ञानवसा’ जपणाऱ्या या केंद्राला सध्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, हे केंद्र निरंतर चालू राहण्यासाठी वैज्ञानिक आणि प्रशिक्षक जिवाचा आटापिटा करत आहेत. त्यांच्या या संघर्षाला मदतीचा हात मिळण्याची गरज आहे.
विज्ञान हे केवळ पुस्तकातून आणि प्रयोगशाळेतून शिकवले तर ते कंटाळवाणे होऊन नावडते बनते. याउलट हसत-खेळत आणि दैनंदिन जीवनातील अनुभवांच्या आधारे सांगितले तर सुलभ होते. याच भावनेतून आणि भूमिकेतून कऱ्हाडात डॉ. संजय पुजारी यांनी पंधरा वर्षांपूर्वी ‘डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र’ची स्थापना केली आणि तेव्हापासून या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. या केंद्राला दरवर्षी हजारो विद्यार्थी तसेच विज्ञानप्रेमी भेट देतात. केंद्रात प्रवेशासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. या शुल्काच्या माध्यमातूनच येथील खर्च भागवला जातो. मात्र, गत वर्षभरापासून या केंद्रात येणाऱ्या सहली बंद झाल्या आहेत. तसेच भेट देणाऱ्या विज्ञानप्रेमींची संख्याही हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आहे. त्यामुळे हे केंद्र चालविण्यासाठी कोणत्याच माध्यमातून हातभार लागत नसल्यामुळे डॉ. संजय पुजारी यांच्यासह तेथील तीन शिक्षक हतबल झाल्याचे दिसते.
गत वर्षभरापासून केंद्राचा खर्च भागविण्यासाठी डॉ. संजय पुजारी हे आटापिटा करत आहेत. मात्र, केंद्राचा महिन्याचा खर्च ३० ते ३५ हजार रुपये असून, हा खर्च एकट्याने भागविणे सहजशक्य नाही. त्यामुळे केंद्राला आर्थिक हातभार लावण्यासाठी सामाजिक संघटनांसह विज्ञानप्रेमींनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
- चौकट (फोटो : ०५ केआरडी०४)
केंद्रात काय आहे ?
१) आकाश दर्शनासाठी दीड लाखांचे टेलिस्कोप
२) अवकाश दर्शनासाठीच्या पाच मोठ्या दुर्बिणी
३) दोनशेहून जास्त विविध वैज्ञानिक प्रयोग
४) हजारो रुपये किमतीच्या ऐंशी बोलक्या बाहुल्या
५) विज्ञानाच्या पाच हजार पुस्तकांची लायब्ररी
६) तंत्रज्ञान, खगोलशास्त्राच्या दीड हजार डीव्हीडी
- कोट
विज्ञान हे केवळ वर्गात शिकवण्यापेक्षा विद्यार्थ्यांना ते अनुभव आणि निरीक्षणातून शिकवल्यास त्यांच्यामध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण होते. याच हेतूने मी हे केंद्र उभारले आहे. सध्या हे विज्ञान केंद्र आर्थिक अडचणीत असून, मदतीची गरज आहे.
- डॉ. संजय पुजारी, संस्थापक
- चौकट
विज्ञानाचे वेगवेगळे प्रयोग
या केंद्राद्वारे शाळांच्या सहली तसेच प्रत्येक रविवारी विज्ञान प्रसारासाठी कार्यशाळा आयोजित केल्या जातात. बाहुलीनाट्य, गाणी, स्लाईड शो, डॉक्युमेंट्री, प्रदर्शने, फिरती प्रयोगशाळा तसेच विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा आणि कुतूहल वाढीस लागण्यासाठी अनेक वैज्ञानिक प्रयोगही याठिकाणी केले जातात.
- चौकट (फोटो : ०५ केआरडी ०५)
...असे मिळाले नाव
कोलंबिया यानाला २००२ साली अपघात झाला आणि त्यामध्ये भारताच्या अवकाशकन्या कल्पना चावला यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यावेळी कऱ्हाडचे हे विज्ञान केंद्र कल्पना चावला यांच्या नावाने सुरू करण्याचा निर्णय डॉ. पुजारी यांनी घेतला. त्यासाठी दिल्लीजवळील कर्नाळ येथील चावला कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांची सहमतीही घेतली आणि अखेर या केंद्राला कल्पना चावला यांचे नाव मिळाले.
फोटो : ०५ केआरडी ०३
कॅप्शन : कऱ्हाडच्या कल्पना चावला विज्ञान केंद्रात वैज्ञानिक प्रयोगावेळी चिमुकली अशी हरखून जात होती. मात्र, गत दीड वर्षापासून केंद्रात हे चित्र पाहायला मिळालेले नाही.