कोयनेतून कर्नाटकला पुन्हा एक टीएमसी पाणी सोडले
By admin | Published: May 1, 2016 12:11 AM2016-05-01T00:11:56+5:302016-05-01T00:14:14+5:30
पाणी सोडण्यास शुक्रवारपासून सुरुवात
पाटण : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेली कोयना आता कर्नाटकच्या पथ्यावर पडली आहे. महाराष्ट्र शासनाने कर्नाटकसाठी कोयना धरणातून तब्बल दोन टीएमसी पाणी दिले आहे. एक टीएमसी पाणी सोडण्यास शुक्रवारपासून सुरुवात केली आहे.
याबाबत माहिती अशी की, कोयना धरणाच्या २३ एप्रिल रोजी रिझर्व्ह गेटमधून पाणी सोडून २८ एप्रिलपर्यंत एक टीएमसी पाणी कर्नाटकला दिले होते. त्यानंतरही कर्नाटकने अजून एक टीएमसी पाणी देण्याची मागणी केली. त्यावर विचार करून आणखी एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे.
त्याची अंमलबजावणी करत शुक्रवार, दि. २९ रोजी रात्री अकरा वाजता पाणी सोडण्यास प्रारंभ केला. पायथा वीजगृहातून २,१११ क्युसेक आणि गेटमधून १८५० क्युसेक असे ३,९६१ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयनेतून कर्नाटक व सांगलीसाठी सुरू आहे. (प्रतिनिधी)