कार्वे ते कोरेगाव रस्त्याची खड्ड्यांमुळे दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:30 AM2021-04-29T04:30:37+5:302021-04-29T04:30:37+5:30
कऱ्हाड : कार्वे ते कोरेगाव रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे विस्तारले आहेत. त्यामुळे रस्ता अधिकच खराब ...
कऱ्हाड : कार्वे ते कोरेगाव रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे विस्तारले आहेत. त्यामुळे रस्ता अधिकच खराब झाला असून, या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
कार्वेपासून कोरेगावकडे जाणाऱ्या रस्त्याकडे अनेक वर्षांपासून बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्यावर खड्डे पडले की त्याची तात्पुरती दुरूस्ती केली जाते. मात्र, डांबरीकरण केले जात नसल्याने रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, एका ठिकाणी रस्ता पूर्णपणे खचला आहे. वारंवार त्याचठिकाणी रस्ता खचून धोका निर्माण होतो. एका बाजूला नदीपात्राकडे जाणारा तीव्र उतार तर दुसऱ्या बाजूला शेतजमीन असल्यामुळे याठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे. मध्यंतरी याठिकाणी भराव टाकून दुरूस्तीचे काम करण्यात आले. मात्र, सध्या हा भरावही खचला आहे. नदीपात्राच्या बाजूला मोठी घसरण असून, एखादे वाहन या बाजूला गेल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पावसाळा जवळ आला की, तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याची मलमपट्टी केली जाते. मात्र, एकाच पावसात ही मलमपट्टी निघून जाते व खड्डे आणखी विस्तारतात. मात्र, बांधकाम विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.