कार्वेचा कृष्णा पूल बनला धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:39 AM2021-07-27T04:39:54+5:302021-07-27T04:39:54+5:30
कार्वे : कऱ्हाड - तासगाव मार्गावरील कार्वे येथील पुलाची मोठी दुरवस्था झाली आहे. हा पूल कधीही कोसळण्याची भीती असून, ...
कार्वे : कऱ्हाड - तासगाव मार्गावरील कार्वे येथील पुलाची मोठी दुरवस्था झाली आहे. हा पूल कधीही कोसळण्याची भीती असून, प्रवासी जीव धोक्यात घालून पुलावरुन प्रवास करत आहेत.
कार्वे येथे कृष्णा नदीवरील पूल पुराच्या पाण्याने खचला असून, यामुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. विभागात सलग चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडला. जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस पडल्याने हाहाकार माजला होता. ओढे, नाले, नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह होता तसेच कोयना धरणातूनही पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्यामुळे कोयना नदीसह अन्य उपनद्यांचे पाणी कृष्णा नदीत मिसळून नदीला महापूर आला. पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे कार्वे येथील पुलाचे नुकसान झाले असून, पुलाला धोका निर्माण झाला आहे. या पुलाला साठ वर्षे झाली असून, या पुलावरून मुंबई, पुणेहून कऱ्हाडमार्गे कार्वे, तासगाव, सांगली, मिरज अशी वाहतूक होते. या पुलावर वाहतुकीचा मोठा ताण असतो. मात्र, पुलाच्या देखभाल, दुरुस्तीकडे सुरुवातीपासून बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. यंदाच्या पुरात पुलाचे झालेले नुकसान लक्षात घेऊन बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या पुलाची पाहणी करत दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांतून केली जात आहे.
- कोट
कृष्णा नदीवरील कार्वेचा पूल पुराच्या पाण्यामुळे दोन ठिकाणी खचला आहे. त्यामुळे भविष्यात हा पूल कधीही कोसळू शकतो. पुलाला मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे. पुलावरून मोठ्या प्रमाणात होणारी अवजड वाहतूक लक्षात घेऊन बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- संदीप भांबुरे, सरपंच, कार्वे
- चौकट
पुलावर डबकी, झुडपांचे साम्राज्य!
पुलावरील रस्त्यावर पाण्याची डबकी साचली आहेत. ठिकठिकाणी झुडपे उगवली आहेत. पुलावर पावसाचे साठलेले पाणी निघून जाण्यासाठी पाईप आहेत. मात्र, त्यामध्ये माती, कचरा साचला असून, त्यामुळे पाणी साचून राहत आहे. पाईपमधील कचरा, माती साफ करणे गरजेचे आहे. पाण्याच्या डबक्यांमुळे दुचाकी तसेच पायी ये-जा करणाऱ्यांना नाहक त्रास करावा लागत आहे.
फोटो : २६ केआरडी ०२
कॅप्शन : कार्वे (ता. कऱ्हाड) येथील कृष्णा नदीवरील पुलाची दुरवस्था झाल्यामुळे पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.