कास-बामणोली परिसरात तरवे भाजण्यास वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:39 AM2021-04-08T04:39:15+5:302021-04-08T04:39:15+5:30
पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस कास - बामणोली परिसरातील तरव्यांच्या भाजणीस सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसाचा फटका बसण्यापूर्वी भाजण्या ...
पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस कास - बामणोली परिसरातील तरव्यांच्या भाजणीस सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसाचा फटका बसण्यापूर्वी भाजण्या पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.
कास, बामणोली परिसर हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला असून, या ठिकाणी पावसाचे प्रमाण अधिक असते. येथील डोंगरउतारामुळे पावसाचे पाणी पूर्णपणे वाहून जाते. यामुळे जमिनीत अत्यल्प प्रमाणात पाणी मुरते. जमिनी लाल मातीच्या असल्यामुळे शेतकरी भात व नाचणीची पिके मोठ्या प्रमाणावर घेतात. या भागातील जमिनी निकृष्ट व तीव्र डोंगर उताराची तसेच लाल मातीच्या असल्याने पिके चांगली येण्यासाठी खूप मशागत करावी लागते.
या परिसरातील शेतकरी डिसेंबर, जानेवारी महिन्यात झाडांच्या फांद्या तोडून त्यांच्या मोळ्या मोठ्या प्रमाणावर बांधून ठेवतात. यालाच कवळे म्हणतात. होळी या सणानंतर शेतकरी भाताच्या खाचरामध्ये सर्वात खाली शेणाचा थर अंथरून त्याच्यावर कवळे पसरवतात. त्यावर झाडाचा पालापाचोळा, जनावरांचे वाया गेलेले गवत तसेच थोड्या प्रमाणावर माती टाकून सकाळी लवकर तरवा करतात. त्यानंतर गुढीपाडव्याच्या आसपास हा तरवा सकाळी अथवा दुपारी उन्हात पेटवून दिला जातो.
या तरव्यावर पावसाळ्याला सुरुवात होताच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भातांच्या बियाण्यांची पेरणी करण्यात येते. भात लावणीसाठी भाताचे रोप तयार करण्यात येते. या भाताच्या खाचरात तरवा जाळल्यामुळे या रोपांमधील तणांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते तसेच रोपांची वाढसुध्दा चांगली होते. साधारणतः रोपे एक महिन्यांची झाल्यावर तसेच भरपूर पाणीसाठा असल्यावर पावसाळ्यात शेतकरी खाचरात चिखल करून पारंपरिक पद्धतीने भाताची लावणी करतात.
चौकट
पावसाच्या शक्यतेमुळे लगबग !
शेतकरी वर्गाने काही ठिकाणी तरव्यांच्या भाजण्या करण्यासाठी भाताच्या खाचरात कवळे पसरविले आहेत. असंभाव्य पावसाची शक्यता वाटत असल्यामुळे बहुतांश शेतकरीवर्गाने तरवे भाजण्यास सुरुवात केली आहे.
कोट
तरव्यांच्या भाजण्यांमुळे भाताच्या रोपांमधील तणांचे प्रमाण कमी होऊन रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होते. अवकाळी पावसाची शक्यता वाटत असल्याने संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आजपासूनच तरव्यांच्या भाजणीस सुरुवात करण्यात आली आहे.
- गणेश चिकणे, शेतकरी, गेळदरे, ता. जावळी
०७पेट्री तेरवे
कास - बामणोली परिसरातील तरव्यांच्या भाजणीस सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसाचा फटका बसण्यापूर्वी भाजण्या पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.