कास तलाव भरला !
By admin | Published: June 23, 2015 12:25 AM2015-06-23T00:25:39+5:302015-06-23T00:25:39+5:30
कण्हेरच्या पाणी पातळीतही वाढ : बामणोली परिसरात संततधार
पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करीत असलेला कास तलाव पहिल्याच पावसात भरला आहे. तलावाच्या सांडव्यावरून सोमवारी पहाटेपासून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. यामुळे सातारा शहरावरील पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे. दरम्यान, कण्हेर धरणाच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे.
यावर्षी पावसाला काहीसा उशीर झाल्याने सातारा शहरावर पाणीटंचाईचे संकट गडद झाले होते. निम्मा जून संपला तरी सातारा शहरातील अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात होता. गेल्या चार दिवसांपासून शहराच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू झाली. शनिवारपासून पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे कास तलावातील पाणीसाठा वाढू लागला होता. अर्ध्या टीएमसीचे तलाव भरल्याने शहराचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
शहराच्या पश्चिमेस यवतेश्वर, कास, बामणोली परिसरात शनिवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. झरे फुटून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वाहू लागले आहे. कास पठारावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे एकीव धबधब्याला पाणी वाढले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर रस्त्यावरून पाणी जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच लहान-मोठे धबधबेही कोसळू लागली आहेत. कृषी विभागातर्फे बांधलेले बंधारे भरण्याच्या स्थितीत आले आहेत.
यवतेश्वर घाटात दमदार पावसामुळे दरड कोसळून रस्त्यावर माती पसरली आहे. पारंबे फाट्यापासून उजव्या दिशेने रस्त्यावर मोठमोठे दरडी कोसळल्याने रस्त्यावर घसरण निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनावळे ते पारंबे फाटा दरम्यान वाऱ्यामुळे ठिकठिकाणी फांद्या तुटून तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. (वार्ताहर)