बारमाही पर्यटन : कास पर्यटकांना अनुभवता येणार जंगल सफारीचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 04:39 PM2020-01-28T16:39:43+5:302020-01-28T16:43:02+5:30
जागतिक वारसास्थळाच्या यादीत समावेश झालेले तसेच आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणाऱ्या कास पठारावर १ फेबु्रवारीपासून बारमाही पर्यटन सुरू होत आहे. यामध्ये जंगल सफारीचा थरार स्वानुभवता येणार आहे. कास पठार कार्यकारी समिती व वनविभागातर्फे हा निर्णय घेतला आहे.
पेट्री/सातारा : जागतिक वारसास्थळाच्या यादीत समावेश झालेले तसेच आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणाऱ्या कास पठारावर १ फेबु्रवारीपासून बारमाही पर्यटन सुरू होत आहे. यामध्ये जंगल सफारीचा थरार स्वानुभवता येणार आहे. कास पठार कार्यकारी समिती व वनविभागातर्फे हा निर्णय घेतला आहे.
निसर्गरम्य परिसर, चोहोबाजूला दाट हिरवीगार झाडी तसेच निसर्गाचे वरदान लाभलेल्या कास पठार, कास तलाव परिसरात सात पॉर्इंटस् पाहायला मिळणार आहेत. फुलांचा हंगाम नसताना प्रत्येकाकडून वीस रुपये शुल्क आकारून स्वयंभू गणेश, सज्जनगड-उरमोडी दर्शन, हंडा घागर, जंगल व्ह्यू, दगडी कमान, कुमुदिनी गुफा, कण्हेर व्ह्यू अशा सात पर्यटन पॉर्इंटस्मुळे देश-विदेशातील पर्यटकांना बारमाही कासचे पर्यटन घडणार आहे.
या उपक्रमात पर्यटकांना माहिती देण्यासाठी तीस गाईड व कर्मचारी असणार आहेत. सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत पर्यटन करता येणार आहे. कास पठार-राजमार्गावर विश्रांतीसाठी निवाराशेड, स्वच्छतागृहांची व्यवस्था, पिण्याचे शुद्ध पाणी, पठारावर जांभ्या दगडातील पायवाटा, वॉकीटॉकीद्वारे संपर्क ही साधने उपलब्ध असणार आहेत.
पर्यटनाचे सात पॉर्इंटस् अन् माहिती
- स्वयंभू गणेश : प्राचीन काळापासून गणेशाचा आकार असलेली दगडात स्वयंभू मूर्ती दिसून येते.
- सज्जनगड- उरमोडी दर्शन पॉर्इंट : या पॉर्इंटवरून सज्जनगड, उरमोडी धरण दिसते. सूर्योदयावेळी सुंदर दर्शन घडते.
- हंडा घागर : पठारावर नैसर्गिकरीत्या अस्तित्वात असलेल्या या पार्इंटला व त्याच्या आकारानुसार जुनी अनुभवी लोकं हंडा घागर म्हणतात. यावर मनुष्याच्या पायाचे ठसे तसेच घाटाई, वनराई, देवराई दिसते.
- जंगल व्ह्यू : येथून कास जंगल व कास धरणाची भिंत पाहायला मिळते.
- दगडी कमान : पुरातन काळातील नैसर्गिकरीत्या तयार झालेली ही कमान आहे. याला मंडप असेही म्हणतात. शेजारी छोटी गुफा, कमान आढळते. कास तलाव, जंगल तसेच सूर्यास्त पाहण्यासाठीही हे सुंदर ठिकाण आहे.
- कण्हेर व्ह्यू : मेढा परिसर, कण्हेर धरण, मेरुलिंग पर्वतरांगा दिसतात.
- कुमुदिनी गुफा : शिवकालीन राजमार्गावर कुमुदिनी तलावासमोर गुफा आहे. वन्यप्राण्यांच्या निवाऱ्याचे ठिकाण आहे.
कासला बारमाही पर्यटन सुरू झाल्यानंतर पर्यटकांना येथील गुलाबी थंडीसह निसर्ग सौंदर्याचा नजराणा एक ते दीड तासाच्या जंगल सफारीतून घेता येणार आहे.
- बजरंग कदम,
अध्यक्ष, कास पठार कार्यकारी समिती.