‘कास’मध्ये वाढणार अडीचपट पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 11:40 PM2019-03-03T23:40:42+5:302019-03-03T23:40:47+5:30
पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणाची उंची वाढविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. आतापर्यंत सत्तर टक्के काम पूर्ण झाले ...
पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणाची उंची वाढविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. आतापर्यंत सत्तर टक्के काम पूर्ण झाले असून, सध्याच्या तुलनेत धरणाच्या पाणीसाठ्यात यंदा अडीचपटीने वाढ होणार आहे. त्यामुळे सातारकरांना भेडसावणारे पाणीसंकट आता संपुष्टात येणार आहे.
सातारा शहराला कास व शहापूर योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. कास ही सर्वांत जुनी पाणीपुरवठा योजना असून, या धरणातून शहराला दररोज ५.५० लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळा सुरू होताच पातळी खालावू लागते व पाणीसाठा ५ ते ६ फुटांवर येतो. वाढते शहरीकरण आणि पाण्याची दैनंदिन गरज पाहता १ मार्च २०१८ पासून धरणाची उंची वाढविण्याचे काम जलसंपदा विभागाच्या वतीने हाती घेण्यात आले.
पहिल्या टप्प्यात जुन्या धरणाच्या भिंतीपासून साठ मीटर अंतरावर नदीपात्रात नवी भिंत उभारण्यासाठी खोदकाम करण्यात आले. या व्यतिरिक्त धरणाच्या समोरील बाजूस नव्या पाईपलाईनसाठीचे खोदकाम पूर्ण झाले. पाण्याच्या दाबाने धरणाचे स्लायडिंग होऊ नये, यासाठी महत्त्वाचा भाग असणाऱ्या दगडी कोपºयाचेही काम पूर्णत्वास आले आहे.
जुन्या माती धरणाची माथा पातळी १ हजार १२५.५८ मीटर तलांक इतकी आहे. परंतु धरणात १ हजार १२२.४० मीटरपर्यंत पाणी अडवले जात होते. यंदा १ हजार १२८ मीटर तलांकापर्यंत पाणी अडविले जाणार असून, यामध्ये ५.६० मीटरने वाढ होणार आहे. यामुळे धरणाचा पाणीसाठा नेहमीपेक्षा अडीच पटीने वाढणार असून, सातारकरांना पाण्याची कोणतीही कमतरता आता भासणार नाही.