Satara News: बावधनात ‘काशिनाथाचं चांगभलं’चा गजर; ऐतिहासिक, पारंपरिक बगाड सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी
By दीपक शिंदे | Published: March 13, 2023 04:35 PM2023-03-13T16:35:12+5:302023-03-13T16:51:41+5:30
साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली बावधन येथील ऐतिहासिक व पारंपरिक बगाड यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थिती पार पडली
तानाजी कचरे
बावधन : साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली बावधन येथील ऐतिहासिक व पारंपरिक बगाड यात्रा रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत व ‘काशिनाथाचं चांगभलं’च्या गजरात उत्साहात पार पडली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते बगाडाचे पूजन करून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
बावधन येथील भैरवनाथाचे बगाड गावाच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील सोनेश्वर याठिकाणी रविवारी सकाळी आठच्या सुमारास पोहोचले. त्यानंतर बगाड्या दिलीप दाभाडे यांना कृष्णा नदीत विधिवत स्नान घालण्यात आले. त्यानंतर देवदेवतांची विधिवत पूजा-आरती करण्यात आली. बगाड्याला वाजतगाजत बगाडाजवळ नेण्यात येऊन त्याला पारंपरिक पद्धतीचा पोशाख घालून बगाडास टांगण्यात आले. सकाळी साडेअकरा नंतर बगाडाचा गाडा ओढण्यास सुरुवात झाली.
ठिकठिकाणी विसावा घेऊन बगाड ओढणाऱ्या बैलजोड्या बदलण्यात आल्या. बगाडाबरोबर वाघजाईदेवी, भैरवनाथ आणि जोतिबाच्या पालख्यांचेही भाविकांनी दर्शन घेतले. बगाड वाई-पाचवड रस्त्यावर बावधन फाट्यावर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पोहोचले.
वाई व परिसरातील हजारो भाविकांनी बगाड पाहण्याचा आनंद लुटला. गाडा गावाच्या दिशेने जात असताना ठिकठिकाणी शिडाच्या पाच फेऱ्या काढण्यात आल्या. रात्री उशिरा बगाड गावात पोहोचले. यावेळी वाद्यांचा गजर करण्यात आला.
ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना
बागाड यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बगाड गाड्याच्या पुढे व पाठीमागे ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देण्यात आल्या. अनेक भाविकांनी दिलेल्या देगण्यांचा पुकारा यावेळी करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती.
गाडा ओढण्यासाठी धष्टपुष्ट बैल...
- बगाड रथाला शेतातून जाताना एका वेळी १२ बैल जुंपले जात होते. कच्च्या रस्त्यावर आल्यानंतर चार बैल जुंपून बगाड ओढण्यात आले.
- ग्रामस्थांनी बगाडासाठी बैल धष्टपुष्ट केले होते, यासाठी शेतकऱ्यांनी संपूर्ण वर्षभर आपल्या बैलांची निगा राखून त्यांना खुराक देऊन तयार केले होते.
- हे खिलारी बैल पाहण्यासाठी शेतकरी लोक लांबून येत असतात.
- दरवर्षीप्रमाणे यंदा देखील बगाड गाडा ओढणाऱ्या या धष्टपुष्ट बैलांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले.
प्रशासनाचे नेटके नियोजन...
बगाड परिसरात विविध संस्था तसेच मंडळांनी भाविकांच्या सेवेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. वाई व बावधन प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक व १०८ रुग्णवाहिका तैनात करण्यात आली होती. वाई पालिकेचा अग्निशमन बंब, महावितरण विभागाने कर्मचारी रथ मार्गावर तळ ठोकून होते. याशिवाय वाई पोलिसांच्या पथकासह, एक जलद कृतिदलाची तुकडी तैनात होती. पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी देखील बगाड यात्रेला भेट देऊन पाहणी केली.
VIDEO: बावधनात ‘काशिनाथाचं चांगभलं’; ऐतिहासिक, पारंपरिक बगाड सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी pic.twitter.com/BHFRTR4TFc
— Lokmat (@lokmat) March 13, 2023