गनीमी काव्याने काशिनाथाचं चांगभलं!, नियमांची पायमल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 05:29 PM2021-04-02T17:29:59+5:302021-04-02T17:46:55+5:30
CoronaVirus Bawdhan Bagad satara- बावधन येथील ऐतिहासिक व पारंपरिक बगाड यात्रा शुक्रवारी 'काशिनाथाचं चांगभलं'च्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली करीत पोलीस प्रशासनाला गाफील ठेवून हजारो भाविकांच्या उपस्थितीत बावधनचे बगाड काढण्यात आले. बावधन गावात संचारबंदी असताना आदेशाचे उल्लंघन झाल्याने बावधन यात्रा कमिटीवर गुन्हे दाखल केले. कोरोनाचा प्रशासनाने धसका घेतला असला तरीही भाविकांनी कोरोनाची तमा न बाळगता दहा हजार भाविकांनी बगाड्याचे दर्शन घेत यात्रेला हजेरी लावली.
वाई : बावधन येथील ऐतिहासिक व पारंपरिक बगाड यात्रा शुक्रवारी 'काशिनाथाचं चांगभलं'च्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली करीत पोलीस प्रशासनाला गाफील ठेवून हजारो भाविकांच्या उपस्थितीत बावधनचे बगाड काढण्यात आले. बावधन गावात संचारबंदी असताना आदेशाचे उल्लंघन झाल्याने बावधन यात्रा कमिटीवर गुन्हे दाखल केले. कोरोनाचा प्रशासनाने धसका घेतला असला तरीही भाविकांनी कोरोनाची तमा न बाळगता दहा हजार भाविकांनी बगाड्याचे दर्शन घेत यात्रेला हजेरी लावली.
बावधन गावात पोलीस प्रशासनाने अतिरिक्त पोलीस कुमक मागवली होती. गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले असताना बावधन ग्रामस्थांनी अतिशय गुप्तता ठेवून मुत्सद्देगिरीने भल्या पहाटे कृष्णा नदीत बगाड्याला विधिवत स्नान घालून सकाळी सहा वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत बगाडाला सुरुवात केली. पारंपरिक पद्धतीचा पोषाख घालून बगाडास टांगण्यात आले.
यावेळी भाविकांनी नोटांची व नारळाची तोरणे, झेंडे, नवसाचे गोंडे बगाडास बांधले होते. बगाडाबरोबर वाघजाई देवी, भैरवनाथ आणि ज्योतिबाच्या पालख्यांचेही भाविकांनी दर्शन घेतले. सकाळी साडेदहा वाजता बावधनमधील भैरवनाथाच्या मंदिरासमोर पोहोचले. बगाड्याखाली उतरून मंदिरात प्रवेश करताच पोलिसांनी भाविकांना घरी जाण्याचे आवाहन करीत बगाड्यासह यात्रा कमिटीच्या सदस्यांना ताब्यात घेतले.
त्यांची वाई पोलीस ठाण्यात रवानगी करीत बावधन गावातील प्रत्येक घरात जाऊन धरपकड करण्यास सुरुवात केली. अनेकांना ताब्यात घेतले असून, सर्वात मोठी कारवाई केली आहे. सोनेश्वर येथे बगाडाचा प्रारंभ झाल्यानंतर उभारलेल्या मंडपात बावधन युवा ग्रामस्थ मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.
बावधन यात्रेसाठी कडक बंदोबस्त लावण्यात आलेला असताना ग्रामस्थांनी प्रशासनाला न जुमानता बगाड काढल्याने प्रशासनाची मोठी नामुष्की झालेली आहे. दरम्यान, प्रशासनाशी यावेळी प्रसिद्धी माध्यमांनी संवाद साधला असता बावधन ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेला शब्द न पाळल्याने प्रशासनाला बघ्याची भूमिका घ्यावी लागली. त्यामुळे पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
बावधनच्या बगाड यात्रेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १४४ कलम लागू केले असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात बावधन ग्रामस्थांनी एकत्र येऊन कोरोना संसर्गाला निमंत्रण दिले आहे. प्रशासनाबरोबर अनेक वेळा सल्लामसलत करूनही दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे राज्य शासनाने घालून दिलेल्या कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
- धीरज पाटील,
अपर जिल्हा अधीक्षक
कोरोनाची दुसरी लाट येत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने यात्रा, उत्सव साजरे करण्यासाठी बंदी घालण्यात आली असताना दिलेल्या आदेशांची पायमल्ली करीत बावधन यात्रेमध्ये हजारो भाविक सामील झाल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढला असून, याला यात्रा कमिटीसह जबाबदार नागरिकांवर कडक कारवाई होणार, ग्रामस्थ व प्रशासनाचा संघर्ष वाढू नये, यासाठी प्रशासनाने बगाड पूर्ण होऊ दिले अन्यथा कृष्णा नदीवरच बगाड्यावर कारवाई करण्यात आली असती.
- संगीता राजापूरकर,
प्रांताधिकारी