काश्मीरच्या ‘कळ्या’ ग्रंथमहोत्सवात खुलल्या--विचारधारा बदलण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:38 AM2019-01-08T00:38:27+5:302019-01-08T00:40:50+5:30
काश्मीर म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीर धुमसत असून, तेथील सर्वसामान्य जनता होरपळत आहे. विशेषत: तेथील कोवळी मनं कोमेजून जात आहेत.
सचिन काकडे ।
सातारा : काश्मीर म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीर धुमसत असून, तेथील सर्वसामान्य जनता होरपळत आहे. विशेषत: तेथील कोवळी मनं कोमेजून जात आहेत. अशा वातावरणात पुणे येथील सरहद संस्थेने काश्मीरमधील कोमेजू पाहणाऱ्या कळ्यांना आपल्या पंखाखाली घेतलं. महाराष्ट्रात आणून त्यांचं संगोपन केलं, स्वत:च्या पायावर उभं केलं. मराठी मातीत रुजलेली अशीच दोन फुलं साताºयाच्या ग्रंथमहोत्सवात लक्षवेधी ठरली.
मुश्ताक अहमद आणि फिरदोस मीर अशी या युवकांची नावे आहेत. जिल्हा परिषदेच्या मैदानावर सुरू असलेल्या ग्रंथमहोत्सवात विचारांची देवाण-घेवाण सुरू असताना, काश्मीरमधील ही मुलं पुस्तकविक्रीच्या माध्यमातून जम्मू काश्मीरचा वास्तववादी इतिहास येथील संस्कृती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच महाराष्ट्राची विचारधारा काश्मीरच्या मातीत रुजविण्याचा प्रत्यत्न करीत आहेत.
मुश्ताक अहमद ‘लोकमत’शी बोलताना म्हणाला, ‘काश्मीरमध्ये दहशतवाद आहे, परंतु तेथील वास्तव कधीच जगासमोर येत नाही. २००४ मध्ये आम्ही सरहद संस्थेची जोडलो गेलो. तेव्हापासून आम्ही पुण्यात स्थायिक झालो. आम्ही बीएपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. काश्मीरची संस्कृती, येथील वास्तव लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आमची धडपड सुरू आहे.
काश्मीरसह आसाम, मणिपूर आदी राज्यांत दहशतीच्या वातावरणात होरपळलेली आमच्यासारखी अनेक मुले-मुली आज ‘सरहद’च्या माध्यमातून एकत्र आली आहेत. ‘सरदह’मुळे आमच्या पंखांना बळ मिळालं. ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही काश्मीरचा खराखुरा चेहरा लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्राची विचारधारा अन् येथील संस्कृती आम्ही काश्मीरमध्ये रुजविण्याचा प्रयत्नही करीत आहोत. आम्हाला दहशतवाद कायमचा मिटवायचा आहे.
आम्ही जसं महाराष्ट्रात स्वच्छंदपणे वावरतो, त्याचप्रमाणे काश्मीरची जनताही दहशतवादाच्या बेडीतून मुक्त झाली पाहिजे. संजय नहार यांनी सुरू केलेल्या एका पुस्तक प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून आमचे हे काम अखंडपणे सुरू आहे. सातारकर नागरिक व वाचकांमधूनही काश्मीरचे जीवनमान, काश्मीरचा इतिहास, काश्मीरची ५००० वर्षे, कारगील, माझा पाकिस्तान, बृहत भारत अशा पुस्तकांना मागणी असल्याची माहिती फिरदोस मीर याने दिली.
महाराष्ट्राच्या मातीत राहून गेल्या पंधरा वर्षांत आम्हाला खूप काही शिकायला मिळाले आहे. येथील अनुभव आम्हाला काश्मीरमधील नवीन पिढी सुसंस्कृत आणि तिची विचारधारा बदलण्यासाठी प्रेरक ठरत आहे. काश्मीर आणि भारत हे काही वेगळे नाहीत. काश्मिरी म्हटलं की आमच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. हे कुठेतरी थांबायला हवं.
- मुश्ताक अहमद
काश्मीरमध्ये स्वत:च्या घरात जायचं म्हटलं तरी ओळखपत्र सोबत ठेवावं लागतं. पाहावे तिकडे सैन्यातील जवान उभारलेले असतात. महाराष्ट्रात तसं नाही. काश्मीरमधील दहशतवाद, हिंसाचाराचा आता अस्त व्हायला हवा. शिकून घरात बसलेल्या युवकांची मानसिकता बदलण्यासाठी आम्ही आमच्यापरीने सर्वतोपरी प्रयत्न करीत राहणार आहोत.
- फिरसोद मीर
जिल्हा ग्रंथमहोत्सवात ‘सरहद’ संस्थेशी जोडले गेलेल्या काश्मीरमधील युवकांनी पुस्तक विक्रीचा स्टॉल उभारला होता.