कास पठार : फुलांच्या पर्वणीचा सूर्याेदय मावळला हंगामात एक लाख पर्यटकांनी दिली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 08:25 PM2018-10-15T20:25:17+5:302018-10-15T20:33:28+5:30
सातारा शहराच्या पश्चिमेकडे असणाऱ्या कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम ओसरला आहे. तसेच कास पठाराला भेट देणाºया पर्यटकांची संख्याही कमी झाली आहे.
पेट्री/सातारा : सातारा शहराच्या पश्चिमेकडे असणाऱ्या कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम ओसरला आहे. तसेच कास पठाराला भेट देणाºया पर्यटकांची संख्याही कमी झाली आहे. दरम्यान राजमार्गावरील कुमुदिनी तलावातील पांढरी शुभ्र कमळे अजूनही पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असल्याने या ठिकाणी येणारे पर्यटक कुमुदिनी तलावाला भेट देऊन पर्यटनाचा आनंद लुटत आहेत.
फुलांचा हंगाम सुरू होताच देश-विदेशातील पर्यटकांची पावले आपसूकच कास पठाराकडे वळतात. गेल्या दीड महिन्यांपासून लाखो पर्यटकांनी कासला भेट देऊन येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला. सध्या फुलांचा हंगाम ओसरल्यामुळे कास पठाराकडे जाणाºया पर्यटकांकडून आकारण्यात येणारे सर्व प्रकारचे शुल्क बंद करण्यात आले आहे.
राजमार्गावरील कुमुदिनी तलावातील कमळे अजून आठ-दहा दिवसांपर्यंत पाहावयास मिळणार असल्याने ज्या पर्यटकांना ही कमळे पाहावयाची असणार आहेत, त्यांच्याकडून शंभर रुपये शुल्क कास पठार कार्यकारिणी समितीकडून आकारले जाईल, अशी माहिती कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी दिली.
शुल्क वसुली आजपासून बंद
फुलांचा हंगाम सुरू झाल्यापासून आजअखेर १ लाख १ हजार ९६२ पर्यटकांनी कास पठाराला भेट दिली आहे. मंगळवार, दि. १६ पासून कास पठारावरील शुल्क वसुली बंद करण्यात आली आहे. दरम्यान, कुमुदिनी तलावातील पांढºया शुभ्र कमळांचा हंगाम अद्याप सुरू असल्याने ज्या पर्यटकांना ही कमळे पाहायची असतील अशा पर्यटकांकडून शुल्क घेतले जाणार आहेत. तसेच ही फुले दुपारी दोन वाजेपर्यंतच फुललेली दिसतात. तद्नंतर ती मिटली जातात. साधारण एक आठवडाभर या कमळांचा हंगाम राहण्याची शक्यता असल्याची माहिती अध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी दिली.