डेंग्यूची साथ रोखण्यासाठी स्वच्छता राखा
By Admin | Published: June 16, 2015 01:23 AM2015-06-16T01:23:41+5:302015-06-16T01:23:41+5:30
जनजागृती गरजेची : पत्रकार परिषदेत सचिन सारस यांचे आवाहन
सातारा : शहरात अस्वच्छतेमुळे डेंग्यूची साथ निर्माण झाली असून पालिकेच्या वतीने स्वच्छतेची मोहीम राबविली जात आहे. मात्र, शहरात स्वच्छता करताना नागरिकच विरोध करत आहेत. परिसर स्वच्छतेबाबत जनजागृती होणे गरजेचे असून नागरिकांनी पालिकेच्या स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा सचिन सारस यांनी पत्रकार परिषदेत केले.
डेंग्यू, चिकनगुण्या रोग नियंत्रण जनजागृती मोहिमेसंदर्भात माहिती देण्यासाठी सोमवारी नगरपालिकेत नगराध्यक्षांच्या कक्षात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी उपनगराध्या दीपाली गोडसे, मुख्याधिकारी अभिजित बापट, आरोग्य समिती सभापती, जिल्हा हिवताप अधिकारी डी. एस. गंबरे, अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
नगराध्यक्ष सारस म्हणाले, ‘नागरिकांनी गरजेपुरते पाणी साठवावे. जास्त दिवस साठवून ठेवलेल्या पाण्यात डासांची निर्मिती होते. डास चावल्यामुळे डेंग्यू, चिकनगुण्या, हिवताप तसेच साथीचे आजार पसरतात. यासाठी नागरिकांनी घरगुती पाणीसाठे, बॅरल, हौद, गच्चीवरील टाक्या आठवड्यातून किमान एकदा स्वच्छ कराव्यात. दूषित पाणीसाठ्यात टेमि फॉस या अळीनाशकाचा वापर करावा. ताप आल्यास रक्ताची तपासणी करून घ्यावी. रक्ताची तपासणी व औषधोपचार जिल्हा रुग्णालय व पालिकेच्या गोडोली, सदर बझार येथील उपकेंद्रात विनामूल्य उपलब्ध आहेत. नागरिकांनी स्वत:चे घर, परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन उपनगराध्यक्षांनी केले.
मुख्याधिकारी बापट म्हणाले, ‘साथीच्या आजार, दूषित पाणी आढळल्यास तत्काळ नगरपालिकेत संपर्क साधावा.’ जिल्हा हिवताप कार्यालयाला पुरेसे मनुष्यबळ व औषधसाठा उपलब्ध करून देण्याबाबत पत्रव्यवहार केला असल्याचे हिवताप अधिकारी डी. एस. गंबरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)