तरसवाडी घाटामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:39 AM2021-01-25T04:39:35+5:302021-01-25T04:39:35+5:30
मायणी : मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावर मायणीपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या तरसवाडी घाट मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी स्थानिक ...
मायणी : मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावर मायणीपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या तरसवाडी घाट मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व प्रवासी वर्ग करत आहे.
मागील काही दिवसांमध्ये माण तालुक्यातील पिलीव घाटामध्ये चोरट्यांनी एसटी बस अडवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्यानंतर, खटाव तालुक्यातील सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर व मायणीपासून १५ किलोमीटर अंतरावर तरसवाडी घाट मार्ग आहे, हा घाट मार्ग सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा आहे. दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात डोंगररांगा तसेच पवनचक्कींचे जाळे पसरले आहे.
राज्य शासनाच्या वनीकरण विभागामार्फत या डोंगरमाथ्यावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. तसेच तरसवाडी, कलेढोण, मुळकवाडी, पाचवड, गारुडी, औंध गावांच्या परिसरात येणाऱ्या डोंगररांगांवर मोठ्या प्रमाणात पाणलोट व वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला आहेत.
तसेच मायणीपासून पंढरपूरपर्यंत सुमारे शंभर किलोमीटरच्या राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वाढली आहे. तसेच घाटमाथ्यापासून जवळ कोणतेही मोठे गाव नसल्याने याठिकाणी चोरट्यांना आपला हात सहज साफ करता येईल, अशा अनेक जागा या घाटमाथ्यावर असून पवनचक्कींमुळे निर्माण झालेल्या डोंगर उतारावरील रस्त्यावरून पळून जाणे सहजशक्य असल्याने या घाटमाथ्यावर कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त व पोलीस चौकी करावी, ही मागणी आता जोर धरू लागली आहे.
कोट..
तरसवाडी (ता. खटाव) या सुमारे अडीच किलोमीटर घाटातील रस्त्यावर कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त व पोलीस चौकी उभी करण्याबाबतचे निवेदन आम्ही पोलीस अधीक्षकांना दिले आहे व ते आमच्या या मागणीचा सकारात्मक विचार करतील, अशी अपेक्षा आहे.
- गोरख पवार, सामाजिक कार्यकर्ते, तरसवाडी (खटाव)