तारळे विभागात युवकांचा पहारा
By admin | Published: July 3, 2015 09:52 PM2015-07-03T21:52:24+5:302015-07-04T00:11:47+5:30
चोरट्यांची भीती : पोलिसांची रात्रगस्त; अनेकवेळा चकवा देत चोरटे पसार
तारळे : गेल्या तीन दिवसांपासून चोरांच्या एका टोळक्याने तारळे परिसरात अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला आहे. प्रत्येक ठिकाणी चोरट्यांचे मनसुबे उधळले जात आहेत. गावातील युवक रात्रीचा दिवस करून रात्र जागून काढत आहेत. पोलिसांची संख्याही कमी आहे. त्यामुळे लोकांमध्ये अजूनही दहशतीचे वातावरण आहे. परिसरातील गावांतून वेगवेगळ्या अफव्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. तारळे गावात सोमवारी रात्रीपासून चोरट्यांच्या टोळीने चोरी करण्याचे प्रयत्न केले. एका ठिकाणच्या चोरीदरम्यान सर्व ठिकाणी लोकांच्या जागरूकतेमुळे त्यांचे प्रयत्न फसले. बुधवारी रात्रीही हायस्कूलच्या पाठीमागे नदीच्या परिसरात टेहळणी करणाऱ्या तरुणांच्या निदर्शनास काही चोरटे आले; पण अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. रात्री दीड वाजेपर्यंत चोरट्यांचा शोध सुरू होता. चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अनोळखी व संशयित व्यक्तींचा तपास पोलिसांबरोबरच ग्रामस्थही करीत आहेत. पोलिसांकडून तारळे परिसरात डोंगराच्या कडेने तपास सुरू असून, अजूनपर्यंत हाती काहीच न लागल्याने चोरट्यांचा बंदोबस्त करणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. तारळे परिसरात बसस्थानक परिसरात फिरणाऱ्या संशयितांची कसून चौकशी करण्यात येत आहे. सुमारे आठवडाभरापासून राहुडे, कडवे परिसरात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. चोरटे परप्रांतीय असून, दुचाकीवरून जाताना अनेकांच्या निदर्शनास आले आहेत. फारशी कल्पना नसल्याने त्यांना कुणीही हटकले नाही; मात्र चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांना याची जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे सतर्क राहून प्रत्येकजण संशयितांशी व अनोळखी व्यक्तींची पोलिसांना कल्पना देत आहे.
राहुडे, तारळेच्या दरम्यान डोंगरापर्यंत उसाचा पट्टा व झाडी असल्याने चोरट्यांचे टोळके तिथेच तळ ठोकून असल्याची शक्यता गृहित धरून तरुणांच्या मदतीने पोलिसांनी कसून तपासणी केली; पण चोरट्यांचा काहीच माग लागला नाही. (वार्ताहर)
चोरट्यांना झाडाझुडपांचा आश्रय..
दोन-तीन वेळा नजरेस पडूनही झाडाझुडपांचा आश्रय घेत चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. तीन दिवसांपासून सुरू असलेला चोरट्यांचा धुमाकूळ थांबविण्यात व त्यांच्यावर जरब बसविण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी होत आहे.