मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत ठेवा
By Admin | Published: March 10, 2015 11:16 PM2015-03-10T23:16:36+5:302015-03-11T00:07:37+5:30
शरयू आसोलकर : जागतिक महिला दिनी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत मार्गदर्शन
कुडाळ : ‘स्त्री जन्म म्हणूनी न व्हावे उदास’ या पंक्तींप्रमाणे आजच्या स्त्रीने आपण स्त्री म्हणून स्वत:ला कमी न समजता चित्रकार जसा आपल्या चित्रासाठी अवकाश निर्माण करतो, तसे अवकाश स्त्रियांनी निर्माण करावे. मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत राखणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. शरयू आसोलकर यांनी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेतील जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात केले. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत जागतिक महिला दिन संत राऊळ महाराज कॉलेजच्या मराठी विभागप्रमुख प्रा. शरयू आसोलकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे कुडाळचे दिवाणी न्यायाधीश जयवंत यादव, अॅड. तृप्ती वालावलकर, डी. एस. हळदणकर, एस. एस. मालवणकर, संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, बॅ. नाथ पै बी.एड.् कॉलेजच्या प्राचार्या डॉ. दीपाली काजरेकर, डीटीएड्च्या प्राचार्या सरोज दाभोलकर, सीबीएस्ई प्राचार्या शिल्पा मराठे, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य नागराज सुनगार आणि कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या रूपाली नार्वेकर, अमृता गाळवणकर उपस्थित होत्या.
जयवंत यादव म्हणाले, वर्षानुवर्षे स्त्रियांवर होणारा अन्याय, त्यांच्यावर टाकण्यात आलेला दबाव दूर करण्यासाठ
ी आणि त्यांना मानसन्मान देण्यासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी कार्य केले. त्याचेच फळ म्हणून आज स्त्रियांना मताचा अधिकार मिळाला. इतकेच नाही, तर त्यांना सक्षम करण्यासाठी अनेक प्रकारचे कायदे करण्यात आले. यापूर्वी फक्त पोटगीचाच अधिकार स्त्रियांना होता; परंतु आता वारसा हक्काचाही अधिकार कायद्याने मिळून पुरुषांच्या बरोबरीने दर्जा दिला आहे, असे सांगितले. यावेळी इतर मान्यवरांनीही भाषण केले. (प्रतिनिधी)
शरीरस्वास्थ्य जपा
प्रत्येक स्त्रीने स्वत:चे मनस्वास्थ्य आणि शरीरस्वास्थ्य जपावे. एकमेकांबद्दल भगिनीभाव जपावा, असे सांगून आद्य कवयित्री महदंबापासून लक्ष्मीबाई टिळक ते बाबूराव बागूल यांच्या कादंबरीतील जानकी इथपर्यंतचा आढावाही डॉ. शरयू आसोलकर यांनी घेतला.