सुनेचा संसार राखतेय सासू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:05 AM2019-01-30T00:05:16+5:302019-01-30T00:05:20+5:30
प्रगती जाधव-पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेमुळे अनेक विस्थापित शिक्षिकांची दूर गावी बदली ...
प्रगती जाधव-पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेमुळे अनेक विस्थापित शिक्षिकांची दूर गावी बदली झाली. नोकरीच्या ठिकाणाहून रोज ये-जा शक्य नसणाऱ्या अनेक शिक्षिकांना त्यांच्या सासूने आधार दिला. दूर गावी गेलेल्या सुनेचा संसार राखण्याचं काम या मायमाऊली थरथरत्या हाताने करत आहेत, हे विशेष!
सासू-सुनेचं नातं समाजमनात अजूनही विळ्या भोपळ्यासारखं असल्याचं भासवलं जातं. या नात्यात स्पर्धा आणि इर्षा असल्याचंही रंगविण्यात येतं; पण सासरची आई म्हणून सासुबाई सुनेच्या अपरोक्ष वाढलेल्या वयातही तिच्या सुनेचा संसार तितक्याच नेटाने करते, असे सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. पाटण तालुक्यातील शिंगणवाडी या शाळेचा १३ पट आहे. शाळेवर दोन शिक्षक आहेत. यातील शबनम कवठेकर या शिक्षिका फलटण तालुक्यातून पाटणला आल्या. शनिवारी सकाळची शाळा उरकून त्या गावी जातात. शनिवार संध्याकाळ आणि रविवार दिवसभर कुटुंबासमवेत राहिल्यानंतर सोमवारी पहाटे त्या मार्गस्थ होतात. जंगलवाडी शाळेत असलेल्या सरस्वती भोईटे याही विस्थापित होऊन फलटणहून पाटणला आल्या. सुमारे साडेतीन किलोमीटर चालून डोंगर चढणं आणि उतरणं त्यांना अशक्य असल्यामुळे त्या सलग सुटी असेल तेव्हाच घरी जातात.
शाळेच्या ठिकाणी आल्यावर ग्रामस्थांच्या सोबतीनं या महिला शिक्षिका राहतात; पण त्यांचे सर्व लक्ष सव्वाशे-दीडशे किलोमीटरवरील त्यांच्या कुटुंबाकडेच असतं. या दरम्यान मुलांचं आजारपण, स्नेहसंमेलन, पै पाहुण्यांचे कार्यक्रम आणि अन्य सर्व गोष्टींची जबाबदारी या शिक्षिकांच्या वयस्क आणि थकलेल्या सासुबाई समर्थपणे सांभाळत आहेत. घरात असलेल्या ज्येष्ठांच्या जीवावर अख्खा संसार टाकून इतरांच्या मुलांना सज्ञान बनवण्याचं बळ या शिक्षकांना येथूनच मिळत आहे. मुलांना शहाणं करताना आपल्या लेकरांच्या गुणवत्तेकडं होणारं दुर्लक्ष पाठीवर घालून पुढची पिढी घडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
‘तू नको ना जाऊस’!
‘विक एण्ड मॅरेज’ची संकल्पना नाईलाजास्तव जगणाºया अनेक मातांना ‘ब्रुटल मंडे’ सतावतो. आई जाणार म्हटल्यावर चिमुरड्यांची झोपच उडते. आई आवरून बाहेर पडायला लागली तर छोटी मुलं तिचा पदर पकडून ‘आई तू नको ना जाऊस,’ अशी आर्जव करतात. कौटुंबिक कर्तव्याबरोबरच विद्यार्थी घडविण्याचं काम करणाºया या माऊली लेकरांना ‘येते लगेच’ असं सांगून बाहेर पडतात, ते थेट पाच दिवसांनी पुन्हा येतात. आई गेल्याच्या दिवशी फोनवर आई बोलत नाही तोवर मुलं अन्नत्यागही करतात.
आजारी पालक
अन् एकटी पत्नी
पाटण तालुक्यातील पाठवडे येथे अनिल कोळेकर यांची बदली झाली आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब नांदल, ता. फलटण येथे वास्तव्यास आहे. कोळेकर यांचे वडील १९७१ च्या युद्धात होते. त्यावेळी त्यांच्या पोटात गोळी लागून एक किडनी निकामी झाली. सध्या ते ८० वर्षांचे आहेत. घरात कोळेकर यांची आई, पत्नी आणि मुलं असा परिवार आहे. वाढत्या वयोमानानुसार युद्ध सैनिक गनर कोंडिबा कोळेकर अंथरुणाला खिळून आहेत, त्यांच्या पत्नीला गुडघ्यांचा त्रास आहे.