Satara: केळवलीच्या तरुणाचा मारहाण करून खून, दोघेजण ताब्यात
By नितीन काळेल | Published: June 29, 2024 07:06 PM2024-06-29T19:06:02+5:302024-06-29T19:06:12+5:30
जुन्या भांडणातून खून झाल्याचा संशय..
सातारा : केळवली, ता. सातारा येथील बेपत्ता झालेल्या तरुणाचा मारहाण करुन खून केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर तपासादरम्यान पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून संबंधितांनी कोणत्या कारणातून खून केला याची माहिती पोलिस घेत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रमेश धोंडिबा जांगळे (वय २५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो २६ जूनपासून बेपत्ता झाला होता. याप्रकरणी त्याचा मोठा भाऊ बाबूराव जांगळे (रा. केळवली, सध्या रा. सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात खबर दिली होती. त्यानंतर पोलिस तसेच नातेवाईकही रमेश जांगळे याचा शोध घेत होते. मात्र, दोन दिवस तो कोठे आढळून आला नाही.
मात्र, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास रमेशचा मृतदेह परळी-केळवली रस्त्यावरील नित्रळ गावच्या हद्दीत मोरीच्या सिमेंटच्या पाईपमध्ये आढळून आला. मृताच्या अंगावर जखमा होत्या. अज्ञाताने मारहाण करुन खून केल्याचे दिसून आले. त्यामुळे याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्याला माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच याप्रकरणी शनिवारी पहाटेच्या सुमारास मयताचा भाऊ बाबूराव जांगळे यांच्या तक्रारीनुसार तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला.
जुन्या भांडणातून प्रकार झाल्याचा संशय..
या खुनप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शनिवारीही पोलिस तपासासाठी गेले होते. याप्रकरणात दोघांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे विचारपूस सुरू आहे. जुन्या भांडणातून मारहाण करुन खून केल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आलेले आहे. तरीही खरे कारण अजून समोर आलेले नाही. तसेच या घटनेत कोणते हत्यार वापरले याचाही पोलिस शोध घेत आहेत.