मातीचं ॠण फेडायला धावले केरळी सातारकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 10:59 PM2018-11-29T22:59:10+5:302018-11-29T22:59:14+5:30
जगदीश कोष्टी । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ज्या मातीत जन्मलो, त्या केरळ राज्यात सप्टेंबरमध्ये प्रलयकारी महापूर आला. क्षणात ...
जगदीश कोष्टी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ज्या मातीत जन्मलो, त्या केरळ राज्यात सप्टेंबरमध्ये प्रलयकारी महापूर आला. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. त्या मातीचं ॠण फेडण्यासाठी केरळी सातारकर पुढे सरसावले. जिल्ह्याच्या विविध भागांत विखुरलेल्या दोनशे कुटुंबांनी पूरग्रस्तांसाठी तब्बल १ लाख, १७ हजार रुपयांची वर्गणी गोळा केली. या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.
सातारा जिल्ह्यात केरळ राज्याच्या विविध भागांतून सुमारे दोनशे कुटुंबे आली आहेत. त्यांचा प्रमुख व्यवसाय गावोगावी बेकरी किंवा महामार्गावर टायर पंक्चर काढणे हा आहे. तर मोजकी कुटुंबं नोकरीच्या निमित्ताने आली आहेत. ही माणसं कष्टकरी आहेत.
बेकरीत बायका-पोरंही राबत असतात. महामार्गाच्या कडेला कडक उन्हात गाड्यांचा धूर सहन करत दिवसभर थांबून पंक्चर काढावं लागतं. तेव्हा त्यांना रोजगार मिळतो. केरळ राज्याच्या विविध भागांतून, प्रांतातून साताºयात आलेल्या प्रत्येकाची जगण्यासाठी धडपड सुरू असली तरी ही समाज संघटनेच्या माध्यमातून ते एकत्र बांधले गेले आहेत. केरळी समाजम् सातारा ही संघटना कार्यरत आहे. वासुदेवन नायर हे या संघटनेचे अध्यक्ष आहेत. केरळमध्ये सप्टेंबरमध्ये महापूर आला. यामुळे मोठे नुकसान झाले. हे समजल्यानंतर अध्यक्ष नायर यांनी एक बैठक बोलावली. केरळी समाजबांधवांना मदत करण्याचा विचार त्यांनी बोलून दाखविला. यासाठी समाजाच्या नावे असलेल्या बँक खात्यात इच्छेनुसार वर्गणी देण्याचे आवाहन केले. केवळ एक-दोन वेळा पाठपुरावा केला असता १ लाख, १७ हजार रुपये जमा झाले.
संघटनेचे पदाधिकारी ही मदत घेऊन केरळला गेले. आपत्तीग्रस्तांना काही जीवनाश्यक वस्तू देण्याचा संकल्प केला. तेथील परिस्थिती पाहिली असता वेगळेच चित्र दिसले. देशभरातून मोठ्या प्रमाणात मदत येत होती. परंतु तिच्या वितरणाचे नियोजन होत नव्हते. नुकसानीसमोर ही मदत खूपच तुटपुंजी होती. त्यामुळे साहित्य देऊन उपयोग होणार नाही. हे लक्षात आल्यावर त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अध्यक्ष वासुदेवन नायर यांच्यासह प्रमुख पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला.